निखिल मेस्त्री,
पालघर/नंडोरे- इंदिरा आवास योजनेअंतर्गत पालघर जिल्हयातील ८ तालुक्यात उभारण्यात आलेली ३९७१ घरकुले दुसरा हप्ता न मिळाल्याने अर्धवट राहीलेली आहेत. यामुळे पावसाळयापूर्वी राहावयास जाता येईल. या आशेवर असलेल्या व आपले जुने घर मोडून घरकुल उभारणाऱ्या अनेक कुटुंबांना आपल्या नातेवाईकांच्या घराचा आसरा घ्यावा लागत आहे किंवा भाडयाने घर घेण्याचा प्रसंग ओढावला आहे. इंदिरा आवास घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला घरकुलासाठी ९५ हजार इतके अनुदान दिले जाते. पालघर जिल्हयात डहाणू तालुक्यात २३९, जव्हार तालुक्यात १४६, मोखाडा तालुक्यात ३०८, पालघर तालुक्यात ५३९, तलासरी तालुक्यात ७४२, वसई २९, विक्रमगड १२३८, तर वाडयात ७३० लाभार्थ्यांना घरे मंजूर होऊन या सर्व लाभार्थ्यांनी या घराचे जोते व त्यावर भिंतीही उभ्या केल्या पहिल्या हप्त्याची रक्कम वापरून ठरावीक काम पूर्ण झाल्यानंतर या लाभार्थ्यांना ३५ हजाराचा दुसरा हप्ता मिळणे अपेक्षित होते. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतरही हा हप्ता न मिळाल्याने ही घरकुले अर्धवट स्थितीत राहीलेली आहेत. निधीअभावी अपूर्णवस्थेत असलेल्या घरांचे तसेच घर बांधण्यासाठी आणलेल्या सामनाचे पावसामुळे नुकसान होतांना दिसते. कष्टाचे पैसे जमवून थोडे चांगले घर असावे म्हणून घरासाठी अतिरिक्त पदरमोड करून वाचवलेले पैसेही पाण्यात गेल्याचे लाभार्थी म्हणत आहेत.घरे मंजूर झाल्याची कागदपत्र निधी हस्तांतरण आदेशानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट शासनाकडून निधी जमा होणे, पहिल्या हप्त्यानंतर ठरावीक काम पूर्ण झाल्यानंतर घरांचे मूल्यांकन आदी इंदिरा आवास योजनेची कार्यवाही आॅनलाईन पध्दतीनेच केली जात आहे. मात्र राज्य पातळीवरील आॅनलाईन प्रणातील दोष निर्माण झाल्याने विलंब होत असल्यामुळे जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. याचाच फटका पालघर जिल्हयातील लाभार्थ्यांनाही बसत आहे. त्यामुळे आॅनलाईन प्रणालीतील दोष दुरूस्त होऊन दुसरा हप्ता लाभार्थ्यांना हाती मिळणार कधी हा प्रश्न उपस्थित होत आहे.