ठाणे : ठाणे महापालिकेच्या सातव्या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर कब्जा मिळवून शिवसेनेने पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यांना तब्बल १० लाख ७ हजार ५१६ मतदारांचा जनाधार मिळाला आहे. भाजपाला २३ जागा मिळाल्या. परंतु मतांच्या आकडेवारीनुसार ते दुसऱ्या स्थानावर आहेत, तर ३४ जागा मिळविणारा राष्ट्रवादी काँग्रेस मतांच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या स्थानी आहे. भाजपाला या निवडणुकीत चार उमेदवारांचे मिळून तब्बल ७ लाख १५ हजार मते मिळाली असून त्यांच्या तुलनेत ३४ जागा मिळविणाऱ्या राष्ट्रवादीला ४ लाख ६२ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवूनही भाजपा तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. परंतु ठाण्यात भाजपा आणि राष्ट्रवादीला समाधानकारक मजल मारण्यात यश आले असले तरी देखील पूर्वीचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याने कॉंग्रेसच्या पारड्यात मात्र अपयश टाकले असून मनसेची देखील २०१२ च्या तुलनेत यंदा मतांची चांगलीच घसरण झाली आहे. महापालिका निवडणुकीत २५ पक्षांचे तब्बल ८०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पैकी शिवसेनेने आपले ११९ मावळे रिंगणात उतरविले होते. या मावळ्यांना महापालिका हद्दीतील १० लाख ७ हजार ५१६ मतदात्यांचा जनाधार मिळाला आहे. एकूणच त्यांच्या प्रत्येक उमेदवारांच्या सरासरी मतांची संख्या ही ८ हजार ४६६ इतकी असल्याची माहिती नुकत्याच सादर झालेल्या मतांच्या एकूण आकडेवारीवरुन दिसत आहे. एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार होता. त्यानुसार जर ठाणेकरांच्या पाठिंब्याची आकडेवारी मांडली तर मतदान करणाऱ्या सव्वा सहा लाख ठाणेकरांपैकी २ लाख ५१ हजार ठाणेकरांनी शिवसेनेला पसंती दिली आहे. त्या खालोखाल १ लाख ७८ हजार ठाणेकरांनी भाजपला मिळाली आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेबरोबर युतीत लढली होती. त्यावेळेस केवळ आठ ठिकाणी त्यांनी विजय संपादीत केला होता. त्यांना केवळ ३१ हजार ४९२ ठाणेकरांनी पसंती दिली होती. मात्र, यंदा युती तुटली आणि विधानसभेप्रमाणेच ठाण्यातही भाजपा स्वबळावर लढली आणि या ठिकाणी त्यांनी १२० शिलेदार उभे केले होते. या शिलेदारांना ठाणेकरांनी पसंती मोहर दर्शवत लाखोंची मते त्यांच्या पदरात टाकली आहेत. २०१२ च्या तुलनेत त्यांच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांच्या तुलनेतही जास्तीची आहे. (प्रतिनिधी)>सरासरी मतसंख्या २६२६महापालिका निवडणुकीत १ लाख १५ हजार ठाणेकरांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. कॉग्रेसचा या निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांच्या ५३ उमेदवारांना १ लाख ३९ हजार मते मिळाली आहेत. ३४ हजार ७९४ ठाणेकरांचा त्यांना पाठिंबा असून त्यांच्या ५३ उमेदवारांची सरासरी मतसंख्या २६२६ इतकी आहे. त्यापैकी फक्त तीन उमेदवारांना विजय नोंदविता आला आहे. त्यात मनसेचे ९९ उमेदवार रिंगणात होते. मात्र, त्यापैकी एकालाही विजय नोंदविता आला नसला तरी देखील मनसेला १ लाख ५७ हजार ५७४ मते मिळाली असून ३९ हजार ठाणेकरांच्या पाठिंब्यासह त्यांच्या उमेदवारांची सरासरी मते फक्त १५९१ इतकी होत आहेत.
भाजपा मतांमध्ये दुसऱ्या स्थानावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 03:38 IST