अलिबाग : मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील वाळीतग्रस्त हरिदास बाणकोटकर यांना गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा वाजता त्यांच्या घरासमोरच गावातील जमावाने प्राणघातक हल्ल्या केला. तर त्यांच्या मोटारसायकलवर दगड टाकून ती संपूर्ण मोडतोड केल्याप्रकरणी राजपुरी कोळीवाड्यातील अकरा ग्रामस्थांवर मुरुड पोलिसांंनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे दुस-यांदा हल्ला झाल्याने वाळीतग्रस्तांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या या अकरा हल्लेखोर ग्रामस्थांमध्ये प्रलय आंबटकर, मंगेश कुणबी, प्रसाद आंबटकर, कृष्णा चव्हाण, जेमिनी आंबटकर, हिरकणी गिदी, चंद्रकांत चव्हाण, नारायण चव्हाण, जगदीश चव्हाण, रतन चव्हाण, प्रमोदिनी चव्हाण यांचा समावेश आहे. बाणकोटकर कुटुंबावर पहिला प्राणघातक हल्ला ८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता राजपुरी कोळीवाड्यातील प्रमुख पंचवीस स्त्री-पुरुषांंच्या समूहाने केला. समुद्र किनारी असलेली त्याची चहाची टपरी व झोपडी पूर्णपणे तोडून टाकली. या साऱ्या प्रकारास विरोध करण्यासाठी पुढे आलेल्या हरिदास बाणकोटकर, त्यांच्या पत्नी गीता बाणकोटकर यांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली.या प्रकरणी मुरुड पंचायत समितीच्या माजी सभापती नीता विजय गिदी, राजपुरी महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना गिदी, राजपुरी पोलीस पाटील यांच्या पत्नी रुपलता आंबटकर, राजपुरीच्या सरपंच हिरकणी गिदी, नारायण चव्हाण, विठा चव्हाण, ताई गिदी, देवकी आगरकर, निना मालीम, पदमू खरसईकर, जनाबाई चव्हाण, सुनंदा घागरी या बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांची तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्यासमोर समज देऊन बंधपत्रावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान पुन्हा एकदा जमावाकडून बाणकोटकर कुटुंबियांवर हल्ला करण्यात आल्याने येथील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. यामुळे २००९ पासून वाळीत टाकण्यात आलेल्या मुरुड तालुक्यातील राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास बाणकोटकर यांच्या पत्नी गीता बाणकोटकर, आठवीत शिकणारी मुलगी रिया, चौथीत शिकणारा मुलगा आकाश, बालवाडीत असलेला गणराज व दीड वर्षाचा रिष अशा सहाजणांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. (विशेष प्रतिनिधी)
वाळीतग्रस्तांवर दुसऱ्यांदा हल्ला
By admin | Updated: April 13, 2015 11:38 IST