पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्याविरोधात सबळ पुराव्यांचा शोध सुरू आहेत़ अनेक पुरावे अद्याप गोळा करायचे आहेत. त्यासाठी तपासाचे संपूर्ण अधिकार एसीबीला (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) दिले आहेत. सबळ पुरावे हाती येताच त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी विलंब करणार नाही, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) के. पी. बक्षी यांनी दिली.सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ते येथे आले होते. त्यानंतर कोल्हापूरला रवाना होताना त्यांनी वाटेत पंढरपुरात थांबून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया आणि पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित होते. भुजबळांच्या विरोधातील चौकशीत एसीबीला पूर्ण अधिकार दिले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना कायदेविषयक लागणारे सल्लागार, तपासासाठी लागणारे तज्ज्ञ चार्टर्ड अकाऊंटंट अशा सर्व गोष्टींची पूर्तता शासनाने केली आहे. त्यामुळे तपास वेगाने सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोपी आणि साक्षीदारांच्या जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यावर अधिक भर देणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.राज्यामध्ये असहिष्णू वातावरण नाही. येथील महिला सुरक्षित आहेत. काही घटना घडल्या असतील; मात्र त्यामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण गढूळ नाही.- प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक
भुजबळ, पवारांविरोधात सबळ पुराव्यांचा शोध सुरू
By admin | Updated: October 20, 2015 01:16 IST