मुंबई : गुजरातच्या सागरी हद्दीत घुसलेल्या संशयास्पद बोटीची दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला मुंबई व आसपासच्या परिसरातील सागरी सुरक्षा अभेद्य ठेवली गेली आहे का, याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश मंगळवारी दिले़न्या़ व्ही़ एम़ कानडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ २६/११ हल्ल्यासाठी पाक अतिरेकी सागरीमार्गे मुंबईत घुसले होते़ त्यामुळे याचा धडा घेत शासनाने सागरी सुरक्षा अधिक कडेकोट करण्यासाठी नेमके काय केले आहे याचा खुलासा करावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे़त्याचवेळी मुंबई पोलिसांच्या शस्त्रांसाठी गेल्यावर्षी नवीन धोरण आखले गेल्याचे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी न्यायालयाला सांगितले़पुणे येथील अश्विनी राणे यांनी त्यांच्या पतीच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी फौजदारी याचिका केली आहे़ या याचिकेद्वारे न्यायालयाने पोलिसांच्या शस्त्रांबाबत व नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी अनेक मुद्दे सुनावणीसाठी स्वत:हून दाखल करून घेतले़ त्यानुसार गेल्या सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या शस्त्रांच्या धोरणासंदर्भात विचारणा केली होती़ मुंबई पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्रे नसल्यानेच मुंबई हल्ल्यात अनेक दिग्गज अधिकाऱ्यांचा बळी गेल्याचे मतही न्यायालयाने व्यक्त केले होते़या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली़ त्यात न्यायालयाने सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला़ गुजरातच्या सागरी हद्दीत एक अनोळखी बोट येते व तिचा पाठलाग केल्यानंतर त्या बोटीचा स्फोट होतो़ हे गंभीर असल्याने मुंबईच्या सागरी सुरक्षाही अभेद्य होणे आवश्यक असून येथील सुरक्षा तेवढ्या ताकदीची आहे की नाही, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे मतही न्यायालयाने या वेळी व्यक्त केले़ यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे़ (प्रतिनिधी)
सागरी सुरक्षा अभेद्य आहे का?
By admin | Updated: January 14, 2015 04:55 IST