मालवण : जिल्ह्यासह मालवण तालुक्यात सोसाट्याचा वारा, अधूनमधून हजेरी लावणारा पाऊस आणि मध्येच लख्ख ऊन असा खेळ रविवारी दिवसभर सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझड झाली, तसेच समुद्रही प्रचंड खवळला होता. त्यामुळे दुपारी भरतीच्या वेळेत देवबाग, तारकर्ली, तोंडवळी व मालवण बंदर जेटी भागात उंच लाटा धडकत होत्या. दरम्यान, हवामान खात्याने बंदर विभागाला धोक्याच्या सूचना दिल्याने रविवारी किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना बंदर विभागाकडून देण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी पडझडवादळी वाऱ्यामुळे शहरातील धुरीवाडा भागातील कृष्णा नामदेव अणावकर यांच्या घरावर झाड कोसळले. तर वायंगणी- कालावल पुलानजीकच्या रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून वीजवाहिन्या तुटल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे दिवसभर विजेचा खेळखंडोबा सुरू राहिला.
मालवणचा समुद्र खवळला
By admin | Updated: June 8, 2015 01:09 IST