मुंबई : महापालिका निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे खासदार व युवानेते ज्योतिरादित्य सिंधिया गुरुवारी मुंबईत दाखल होणार असून, साकीनाका, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व ते एमआयडीसी, सुभाषनगर, अंधेरी पूर्वपर्यंत रोड शो करणार आहेत, तसेच संध्याकाळी अंधेरी रिक्रेएशन क्लबमध्ये व्यापाऱ्यांसोबत ‘नोटाबंदी’ विषयावर संवाद साधणार आहेत. आगमी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सिंधिया यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, तामिळ अभिनेत्री खुशबू याही प्रचारासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी दिग्विजय सिंग वाकोला येथील विश्वकर्मा हॉलमध्ये उत्तर भारतीय समाजातील नागरिकांसोबत चर्चा आणि बाटी चोका या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबईतील जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. तर अभिनेत्री खुशबू मालाड पश्चिम येथे रोड शो करणार आहेत. नंतर धारावी विभागात तामिळ समाजाच्या सभेला संबोधित करणार आहेत. त्याचप्रमाणे, शनिवारी त्यांच्या सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसच्या प्रचारासाठी सिंधिया मुंबईत
By admin | Updated: February 16, 2017 04:46 IST