नोकरीसाठी लाखो गमावले : तरुणाचे आत्महत्या प्रकरणनागपूर : नोकरीच्या आशेने कर्जाने घेतलेली साडेसहा लाखांची रक्कम गमावली. पत्नीही सोडून निघून गेली. परिणामी वैफल्यग्रस्त होऊन एका तरुणाने आत्महत्या केली. या दुर्दैवी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी एका शाळा संचालकाला अटक करून, त्याचा १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. प्रदीप श्यामराव कडू रा. नंदनवन असे आरोपीचे नाव असून, तो नरेंद्रनगर येथील हरिभाऊ वानखेडे शिक्षण संस्थेचा काही काळ संचालक होता. नीलेश भोजराज कुकडे असे मृताचे नाव असून, तो चिटणवीसनगर येथील रहिवासी होता. या प्रकरणाची हकीकत अशी की, प्रदीप कडू संचालक असलेल्या शाळेत त्याची पत्नी वैशाली प्रदीप कडू ही शिक्षिका होती. या दोघांनी नीलेश आणि त्याच्या वडिलांत विश्वास निर्माण करून ६ लाख ५० हजार रुपये दिल्यास नीलेश याला आपल्या शाळेत लिपिकाची नोकरी देतो, असे आमिष दाखविले होते. या बापलेकाने कर्ज काढून २१ नोव्हेंबर २००९ रोजी ४ लाख रुपये दिले. त्यानंतर २ लाख ५० हजार रुपये दिले. संपूर्ण रक्कम घेऊन जागा रिक्त नसल्याचा बहाणा करीत दिवाळीपर्यंत थांबा, असे त्याला म्हटले होते. नीलेश नोकरीसाठी त्यांना वारंवार भेटत होता. त्यानंतर त्याने पैसे परत मागण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे या दाम्पत्याने शक्कल लढवून त्याला बिनपगारी नोकरीवर रुजू करून घेतले होते. पुढे हे दाम्पत्या त्याला ‘अप्रुव्हल’ आल्यानंतर पगार सुरू करू, असे आमिष दाखवीत राहिले. आज-उद्या पगार मिळेल या आशेने त्याने यवतमाळच्या सीमा नावाच्या एका तरुणीसोबत लग्न केले होते. परंतु नीलेश घरी पगार आणत नसल्याने कफल्लक आयुष्य जगणे तिच्या नशिबी आले होते. मित्रांकडून कर्ज घेऊनच तो आपला संसार चालवीत होता. परिणामी तीही त्याला सोडून निघून गेली होती. (प्रतिनिधी)अन् शाळाही विकलीपुढे या संचालकाने आपली शाळा ठाकूर नावाच्या एका व्यक्तीला विकून टाकली. त्यामुळे या नव्या संचालकाने बिनपगारी नीलेशला शाळेतून काढून टाकले होते. नीलेशने पुन्हा कडू दाम्पत्याची वारंवार भेट घेऊन आपले पैसे परत मागण्याचा तकादा लावला होता. ‘तू आम्हाला गैरकायदेशीर कामासाठी पैसे दिले आहे, आम्ही तुलाच उलटे फसवू’, अशी धमकी या दाम्पत्याने नीलेशला दिली होती. पैसे गमावले, पत्नीही गमावली, उलट आपल्यावरच कारवाई होईल म्हणून नीलेश वैफल्यग्रस्त झाला होता. त्याने आपली कर्मकहाणी लिहून ६ जुलै २०१४ रोजी स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नीलेशचा भाऊ राजेश भोजराज कुकडे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी प्रदीप कडू, त्याची पत्नी वैशाली कडू आणि नीलेशची पत्नी सीमा यांच्याविरुद्ध भादंविच्या ३०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रदीपला अटक केली.
शाळा संचालकाला अटक
By admin | Updated: July 18, 2014 01:00 IST