हिंगोली : राज्यस्तरीय निविदा अंतिम झाल्याशिवाय जिल्हास्तरावर खरेदी करता येणार नसल्याचा अजब निर्णय शासनाने घेतल्याने, राज्याच्या २0३ निविदा प्रलंबित असून, त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तर सर्दी, खोकला व तापाचे औषधही मिळत नसल्याचे चित्र आहे.मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत हे चित्र असून, आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, राज्यभरच हा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले. राज्य शासनाने केंद्रीय ई-निविदा पद्धत लागू केली आहे. याद्वारे राज्यस्तरावर औषध खरेदी केली जाते. त्यानंतर त्याच दराने जिल्हा परिषद व सामान्य रुग्णालयांना औषध खरेदी करण्याची मुभा आहे. मात्र, यंदाच्या जवळपास २0३ निविदा अजून अंतिम होणे बाकी आहेत. गतवर्षी मार्चला झालेल्या खरेदीचा पुरवठा अजूनही सुरूच आहे. मात्र, त्यात ज्या औषधांची गरज आहे, ती सोडून दुसरीच औषधे पाठविली जात आहे. जिल्ह्यांची निकड लक्षात घेतली जात नाही. शिवाय वर्ष संपल्यामुळे गेल्या मार्चच्या दरानुसार नवीन खरेदीही करता येत नाही, अशी अडचण झाली आहे. जि.प. व सामान्य रुग्णालयांकडे जिल्हा वार्षिक योजनेत दिले जाणारे कोट्यवधी रुपये एकीकडे पडून आहेत, तर दुसरीकडे औषधांचा तुटवडा आहे. साध्या सर्दी, खोकल्याच्या औषधाचीही उपलब्धता नसल्याने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सामान्य, ग्रामीण रुग्णालयांनी बालरुग्ण विभाग चालवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जून-जुलैमध्ये जि.प. व रुग्णालयांकडून औषध खरेदीबाबत प्रस्ताव मागविले होते. मात्र, त्यापैकी पाच ते दहा लाखांचीच खरेदी करण्याची परवानगी दिली. सुधारित प्रस्तावही पाठविले गेले, तरीही नवीन परवानगी मिळालेली नाही. शिवाय राज्यस्तरीय निविदाही अंतिम झालेल्या नाहीत. त्यामुळे एक-दोन नव्हे, तीस ते चाळीस प्रकारची औषधे मिळेनाशी झाली आहेत. (प्रतिनिधी)उसनवारीवर कारभारअनेक जिल्ह्यात कोणती औषधे जास्त व कोणती कमी आहे, हे आरोग्य संचालकांना आॅनलाइन कळते. एखाद्या जिल्ह्यातून ओरड झाल्यास, इतर जिल्ह्यांतून उसनवारीवर औषधे पाठविली जातात. परंतु त्यातही खूप वेळ जात आहे. ज्या औषधांचा सगळीकडेच तुटवडा आहे, त्यांचा प्रश्न सुटलेला नाही.
राज्यात औषधांचा तुटवडा!
By admin | Updated: December 16, 2015 01:53 IST