मुंबई : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एसटीकडेच विविध कारणांमुळे, प्रत्यक्षात प्रवाशांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत एसटीचे तब्बल १५ कोटींहून अधिक प्रवासी घटले असून, हा सर्वात मोठा फटका मानला जातो. भविष्यात प्रवासी संख्येत आणखी घट होईल, या भीतीने एसटी महामंडळाने जानेवारी २0१७ पासून तीन महिन्यांसाठी ‘प्रवासी वाढवा विशेष अभियाना’चा निर्णय घेतला आहे. यात प्रवासी वाढवण्यास मदत करणाऱ्या आगार, चालक व वाहकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. एसटी बसची झालेली दुरवस्था, अस्वच्छता, वाढलेले भाडे आणि अवैध प्रवासी वाहतूक अशा विविध कारणांमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करत असताना, पाच वर्षांत यात मोठी घट होण्यास सुरुवात झाली. आता हीच संख्या दररोज ६४ लाख ७ हजार प्रवासी एवढी झाली आहे. २0११-१२ मध्ये २६0 कोटी ४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, हाच आकडा २0१५-१६ मध्ये पाहिल्यास २४५ कोटी ६0 लाखांपर्यंत आला. एकंदरीतच प्रवासी संख्येत होत चाललेली घट पाहता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी, एसटी महामंडळाकडून नवीन एसी बसेस घेतानाच स्वच्छता मोहीम व कॅटरिंग व्यवस्थेतही बदल केला जात आहे. तरीही प्रवाशांत काही केल्या वाढ होताना दिसत नाही. त्यामुळेच एसटीकडून १ जानेवारी ते ३१ मार्च २0१७ पर्यंत राज्यभर ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रवासी वाढवण्यास मदत करणाऱ्या आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांना दरमहा १ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे, तसेच दुसऱ्या क्रमांकावरील आगारास ७५ हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावरील आगाराला ५0 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावणाऱ्या विभागास ५0 हजार रुपयांचे विशेष बक्षीस दिले जाईल. (प्रतिनिधी)वाहक, चालकांनाही बक्षीसअभियानांतर्गत एसटीच्या चालक-वाहकांनाही बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात येईल. सर्वाधिक प्रवासी वाहून नेण्यास मदत करणाऱ्या वाहकाला दरमहा रोख ५ हजार रुपये, तर या कामगिरीमध्ये साथ देणाऱ्या चालकाला ३ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. या अभियानामुळे गेल्या पाच वर्षांत एसटीपासून दुरावलेला प्रवासी पुन्हा जोडला जाईल, अशी आशा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.
एसटीला वाचवा हो...
By admin | Updated: December 22, 2016 04:32 IST