रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व उत्तर प्रदेशातील बागपतचे भाजपा खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांच्या ‘महाराष्ट्र सदन’मधील पंधरा दिवसांचा मुक्काम कोंडीत सापडला आहे. त्यांच्या मुक्कामामुळे महाराष्ट्रातील लोकांची अडचण होत असून, त्यांना कोणत्या नियमानुसार मंत्र्यांच्या समकक्ष असा कक्ष दिला गेला, अशी विचारणा शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथील महाराष्ट्राचे निवासी आयुक्त बिपीन मलीक यांच्याकडे पत्रद्वारे केली आहे.
मंगळवारी दिलेल्या या पत्रवर अजून कोणतेच उत्तर मलीक यांनी दिलेले नाही. मात्र सिंग यांना सदनात दिल्या जाणा:या वागणुकीवर जोरदार हरकत नोंदविली आहे. पत्रत त्यांनी म्हटले आहे, की सदनात लोकांचा अतिरिक्त लोंढा आहे. खासदारांना मुक्कामाला खोल्याही उपलब्ध होत नसून सदनात अनेक गैरकायदेशीर कृत्ये घडत आहेत. सत्यपाल सिंह हे उत्तरप्रदेशातून निवडून आले आहेत. त्यांना सदनातील कक्ष बेकायदेशीरपणो दिला गेला आहे. विशेष म्हणजे त्यांना दिलेला कक्ष हा मंत्र्यांच्या कक्षाच्या तोलाचा आहे.
याबाबत निवासी आयुक्त बिपीन मलीक, खा. आढळराव पाटील व डॉ. सत्यपाल सिंह यांना ‘लोकमत’ने संपर्क केला. मलीक म्हणाले, तुम्ही विचारणा करता त्याबद्दल आभारी आहे. पण मी या विषयाचे उत्तर आढळराव पाटील यांनाच देईन. आढळराव पाटील म्हणाले, सत्यपाल सिंह हे उत्तरप्रदेशातून निवडून आले आहेत. त्यांना कोणत्या अधिकारात या ठिकाणी खोली दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या मतदारसंघातील अनेक लोक असतात, त्यांचाही मुक्काम सदनात होतो. खूप वाईट गोष्टी चालतात, त्यांची नोंद मी वेळोवेळी दिली आहे. पत्रतही लिहिले आहे. या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. डॉ. सत्यपाल सिंह म्हणाले, लोकसभा सचिवालयाने सांगितले की, महाराष्ट्र सदनात खूप खोल्या असल्याने तुम्ही तिथे राहू शकता. पंधरा दिवसांपासून मी येथे आहे. मी उत्तर प्रदेशातून निवडून आलो असलो तरी, तीस वर्षे महाराष्ट्रात होतो. पोलीससेवा केली. आता कुठे उत्तरप्रदेशात आलो. मी उत्तर प्रदेशी कमी आणि महाराष्ट्रीय अधिक आहे.