शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

साताऱ्याचे ‘जलयुक्त शिवार’ अभियान!-

By admin | Updated: March 5, 2017 00:07 IST

जागर

देशातील विविध नदी खोऱ्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी पाच-सहा खोरी ही मोठी मानली जातात. गंगेचे विस्तीर्ण खोरे, पूर्वेकडील ब्रह्मपुत्रेचे खोरे, मध्यम भारतातील एकमेव पश्चिम वाहिनी नदीचे नर्मदा खोरे, त्याच्या बाजूला गोदावरी आणि कृष्णेचे खोरे आणि दक्षिणेस तीन राज्यांत पसरलेले कावेरी नदीचे खोरे. या सर्व नद्यांच्या खोऱ्यांत असंख्य उपनद्या आहेत, तसेच अनेक भागांत हजारो हेक्टर क्षेत्र कोरडवाहूसुद्धा आहे. बहुतांश नद्यांवर आता धरणे झाली आहेत. काही धरणांचा इतिहास हा शंभर वर्षांचा झाला आहे. या पाण्याचा वापर कोरडवाहू शेतीला आणि पिण्यासाठी करण्यात येतो आहे. उद्योग-व्यापारासाठीसुद्धा नद्यांवरील धरणांच्या पाण्यामुळे भरभराटी झाली आहे. मात्र, या मोठ्या नदी खोऱ्यातील सर्वच माणसं, गावे किंवा शहरे संपन्न झाली आहेत किंबहुना दरडोई लागणारे पाणी उपलब्ध झाले आहे, असे मात्र दुर्दैवाने दिसत नाही. या सर्व नद्यांची खोरी एकमेकांना जोडण्याचा प्रयोग राबविला पाहिजे, जेणेकरून समुद्राला वाहून जाणारे पाणी अधिकाधिक वापरता येईल, असा एक युक्तिवाद करण्यात येतो.ही सर्व वस्तुस्थिती असली तरी नदी खोऱ्यातील पाण्याचेसुद्धा नीट व्यवस्थापन झालेले नाही. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या महाकाय आणि लांबच लांब वाहणाऱ्या या नद्यांच्या खोऱ्यातील कोट्यवधी जनता किमान पाणी उपलब्धतेपासून वंचित राहते आहे. काही ठिकाणी भौगोलिक रचनेचा अडसर येतो, तर काही ठिकाणी पाणी अडवून ते वितरण करण्याची क्षमता निर्माण करण्यात आलेली नाही. परिणामी दर तीन वर्षांनंतर एक वर्ष पाणीटंचाई किंवा दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. याला कृष्णा खोरे अपवाद नाही. किंबहुना इतर नद्या खोऱ्यांपेक्षा अधिक मोठा दुष्काळीपट्टा कृष्णा खोऱ्यातच आढळून येतो. त्याची व्याप्ती मोठी आहे. विशेषकरून कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक यातून सुटलेला नाही.हा सर्व विषय मांडण्याचे कारण की, गेल्या दोन वर्षांत सलग पाऊसमान कमी झाले. मराठवाड्यात तर दुष्काळच पडला होता. कृष्णा खोऱ्यात पाऊसमान कमी झाला की, कृष्णेच्या उपनद्यांच्या बाजूने पसरलेल्या मोठ्या पट्ट्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. दोन वर्षांपूर्वीच्या परिस्थितीवर कायमची मात करण्यासाठी म्हणून नव्याने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. वास्तविक अशा प्रकारचा प्रयोग अनेकवेळा वेगवेगळ्या नावाने आणि तुटकतुटक पद्धतीने पूर्वी करण्यात आला आहे. नालाबंडिंग ते पाझर तलाव आणि शेततळ्यांची खुदाई ही मोहीम दहा वर्षांपूर्वीही मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली होती. मात्र, या सर्वांमध्ये एकसूत्र नाही. सोयीनुसार आणि काम करणाऱ्या यंत्रणेला काम करण्याच्या सवलतीमुळे दुष्काळी भागात शाश्वत कामे झाली नाहीत. काही ठिकाणी झाली, पण त्यात सातत्य नसल्याने टिकली नाहीत. कृष्णा खोऱ्यातील कायमचे दुष्काळी तालुके म्हणून शिक्का बसलेल्या प्रत्येक गावागणिक पाझर तलाव काढण्यात आले. जत, आटपाडी किंवा सांगोलासारख्या तालुक्यात गावांच्या संख्येपेक्षा पाझर तलावांची संख्या अधिक आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविताना या पाझर तलावांचा विसर पडला आहे. दहा वर्षांपूर्वी शेकड्यांनी शेततळी उभारली, त्यांचा पत्ता शोधावा लागेल. या सर्वांमध्ये एक सुसूत्रता दिसत नाही.ही जरी वस्तुस्थिती असली तरी जलयुक्त शिवार अभियानात सातारा जिल्ह्याने उल्लेखनीय काम केले आहे. वास्तविक क्षेत्रफळाच्या मोजपट्टीवर विचार केला तर देशातील चौथ्या क्रमांकाने कृष्णा खोरे आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पसरलेल्या कृष्णा खोऱ्यात सरासरी तीन हजारांहून अधिक टीएमसी पाणी साठविले जाते. कृष्णा खोऱ्यातील असंख्य नद्यांवर अनेक धरणे आहेत. तरीसुद्धा कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मोठा भूभाग दुष्काळी पट्ट्यात मोडतो. यापेक्षा गमतीचा भाग म्हणजे कृष्णा खोऱ्याचा आरंभबिंदू कृष्णा नदीच्या उगमापाशी आहे. ते ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर! येथे उगम पावलेली ही नदी खाली उतरते आणि वाईमार्गे साताऱ्याहून कऱ्हाडात येते. तेथून भिलवडी, सांगली, मिरजमार्गे कोल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडीपासून पूर्वेला कर्नाटकात शिरते. उत्तर कर्नाटकातून दक्षिण आंध्र प्रदेशातील विजयवाड्यापासून पुढे जात जात बंगालच्या उपसागराला मिळते. ज्या सातारा जिल्ह्यात कृष्णा खोऱ्याचा उगमबिंदू आहे त्याच जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती वारंवार उद्भवते. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रचंड पाऊस पडतो. कृष्णेसह पाच नद्यांचा उगम महाबळेश्वरला होतो. तेथे चार ते पाच हजार सेंटीमीटर पाऊस पडतो. कोयनेच्या खोऱ्यात नवजाला यापेक्षा अधिक पाऊस पडतो. त्यातून एकशे आठ टीएमसीचे भलेमोठे धरण पाहता पाहता भरते. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड परिसरात यापेक्षाही अधिक म्हणजे जवळपास साडे पाच हजार सेंटीमीटर पाऊस कोसळतो. दाजीपूर, आंबोली, पारगड आदी परिसरातही धुवाधार पाऊस कोसळतो. मात्र, महाबळेश्वरपासून केवळ शंभर किलोमीटरवरून सुरू होणारा खंडाळा, लोणंद, फलटण, दहीवडी, म्हसवड, खटाव आदी परिसरात अत्यल्प पावसाचा शिडकाव होतो. ही भौगोलिक अडचण आहे. अरबी समुद्रावर वाहत येणारा मान्सूनचा पाऊस सह्याद्रीच्या उत्तुंग घाटमाथ्याला धडकतो. तेथेच कोसळतो आणि पुढे त्याच वाऱ्याच्या वेगाने ढग पळून पुढे जातात. दख्खनचा पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा, चांदवड, नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, पुण्यातील बारामती, इंदापूर, दौंड, साताऱ्यातील फलटण, खंडाळा, म्हसवड, खटाव, माण, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, आदी तालुक्यांत पाऊस गायब होतो. हा असाच कोरडा पट्टा कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, रायचूर, बेल्लारी, बेळगाव, गदग, हावेरी, आदी जिल्ह्यांतही आहे. हा देशातील कमी पावसाच्या पट्ट्यातील काही भूभागांपैकी एक आहे. याच भागातून कृष्णा आणि तिच्या उपनद्या वाहतात.अशा विरोधाभासाने भरलेल्या परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. साताऱ्याच्या पूर्वेकडील गावे जलयुक्त करण्यासाठी गेली दोन वर्षे सातत्याने काम चालू आहे, अन्यथा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली की, तात्पुरती कामे केली जातात आणि पावसाळा सुरू झाला, थोडा पाऊस पडला की दुष्काळाला विसरले जाते. मात्र, सातारा जिल्ह्याने पाणीदार व्हायचे ठरविले आहे. त्यासाठी २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २१५ गावे निवडण्यात आली. तेथे जे काम झाले आहे, त्याचा सचित्र अहवाल वजा दस्ताऐवज साताऱ्याच्या माहिती कार्यालयाने कॉफीटेबल बुकच्या स्वरूपात मांडला आहे. शासकीय पातळीवर अनेकवेळा असंख्य कामे होतात. त्यांना चांगले यशही मिळते. मात्र, त्याची नोंद करून ठेवणारे अहवाल, पुस्तिका किंवा ग्रंथाची निर्मिती केली जात नाही. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाची निर्मिती हा एक अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्प आहे. त्याच्या पाण्यावर वीजनिर्मिती करणारा प्रकल्प तर अचंबा वाटावा असा प्रकल्प जमिनीखाली राबविण्यात आला आहे, पण त्या कोयनेच्या कहाणीची माहिती फारच कमी आहे. उषा तांबे या सद्गृहस्थ महिलेने ‘कोयनेची कहाणी’ हे पुस्तक लिहिले आहे. (माझ्या वाचण्यात तर तेवढेच एकमेव पुस्तक आहे.) तासगावचे वि. रा. जोगळेकर या प्रयोगशील अभियंत्याने कोयना धरणाच्या उभारणीत योगदान दिले आहे. त्यांनी अलीकडेच आपले आत्मकथन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी सहकाऱ्यांसमवेत कोयना धरण निर्मितीची प्रेरणा आणि थरार नोंदवून ठेवला आहे.सातारा जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान मात्र यास अपवाद ठरले आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या शांतपणे आणि सातत्याने काम करण्याच्या जिद्दीने २१५ गावांत जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाले आहे. या गावांपैकी काही निवडक गावांतील प्रयोग या पुस्तकात मांडले आहेत. विशेष करून या संपूर्ण अभियानाची सचित्र कहाणीच हे पुस्तक सांगते आहे. कोरेगाव तालुक्यातील वॉटरकप बहुमानप्राप्त जायगाव असो की, हिरवे गाव हिरवेगार कसे झाले याची कहाणी असो. भंडारमाचीचे शिवार कसे जलयुक्त झाले, धिगेवाडीचा परिसर कसा परिवर्तीत झाला, लिंबाची वाडीची यशोगाथा काय आहे, झगलवाडीचा प्रयोग काम सांगतो आहे, शून्य ऊर्जेवर आधारित जलसिंचन करण्यात मौजे धामणी गाव कसे यशस्वी झाले, पिंपोडे गावच्या कोरड्या विहिरी आता कशा वाहतात, किवळच्या ओढा जोडणं करुन आणलेले पाणी, राजापूरच्या शिवारात सिंचनाचे मोती, विसापूरचे ठिबकयुक्त सिंचन, आदी गावांच्या कहाण्या या पुस्तकात मांडल्या आहेत. शिवाय जाखणगाव, मिरगाव, कुरवली, गिरवी, सासवड, रानमळा, माण, नरवणे, पांढरवाडी, आदी गावांचे प्रयोगही मांडले आहेत. या शिवाय बाणगंगा, रानमळा, येरळा आणि वसना या नद्यांच्या पुनर्जीवनाचा कार्यक्रमही राबविण्यात आला आहे. त्यांचीही सविस्तर माहिती या पुस्तकात नोंदविण्यात आली आहे. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान राबविताना शासकीय यंत्रणा, कर्मचारी, अधिकारी ते गावागावांतील लोकांनी यात सहभाग घेतला आहे. त्यांचीही माहिती देण्यात आली आहे. आपल्या आजूबाजूला भेडसावणाऱ्या अनेक समस्या असतात. त्या मानवनिर्मित असतील किंवा निसर्गाच्या अवकृपेने तयार झालेल्या असतील, त्यावर मात करण्यासाठी लोकसहभाग हाच महत्त्वाचा भाग असतो. कोणी तरी शासन, अधिकारी किंवा यंत्रणा सर्व काही करेल असे मानू नये, असे या पुस्तकातील लोकांचा सहभाग पाहिल्यानंतर वाटते. या पुस्तिकेची निर्मितीसुद्धा केवळ शासकीय आकडेवारीची जुळवाजुळव करून करण्यात आलेली नाही. साताऱ्यातील वरिष्ठ पत्रकारांच्या सहकार्याने प्रत्येक गावातील अभियानाचे काम पाहून त्यांच्याकडून लिहून घेतले गेले आहे. हासुद्धा एकप्रकारे लोकसहभागाचा प्रयत्न आहे. दुष्काळासारख्या निसर्गनिर्मित समस्या असोत किंवा पुनर्वसनासारख्या मानवनिर्मित समस्या असो किंवा एखाद्या प्रकल्पाची उभारणी असो त्याची सर्वंकष माहिती नोंदवून ठेवली पाहिजे. २००३-०४ मध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली तेव्हा सांगली जिल्ह्यात शेततळ्यांसह अनेक गोष्टी करण्यात आल्या. त्याची माहिती नोंदविणारी उत्तम पुस्तिका काढण्यात आली होती. २००५ मध्ये कृष्णा खोऱ्यात महाकाय पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तिचा फटका सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील अनेक गावांना बसला होता. त्या परिस्थितीची माहिती नोंदविणारी पुस्तिका काढणे आवश्यक होते. दुर्दैवाने अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली तर त्यावर काय उपाय करता येतील यासाठी ती मार्गदर्शक पीठिका होऊ शकते.अशा पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानात केलेले कार्य अभिनंदनीय आहेच. त्या कामाची सविस्तर नोंद घेणारे पुस्तक काढणे ही इतरांना प्रेरणा देणारी, मार्गदर्शन ठरणारी बाब आहे.- वसंत भोसले