सातारा : छायाचित्रे आणि चित्रफितीद्वारे संकेतस्थळाच्या माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार करीत असल्याबद्दल अभिनेत्री सनी लिआॅनविरुद्ध डोंबिवली पाठोपाठ साताऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सामाजिक कार्यकर्तीने याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली आहे. रूपाली सुनील महाडिक (वय ४१, रा. लक्ष्मीनगर, शाहूपुरी) असे फिर्यादीचे नाव असून, त्या सामाजिक कार्य करतात. सनी लिआॅन व तिच्या साथीदारांनी संकेतस्थळावरून अश्लीलतेचा प्रसार चालविला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ‘सनी लिआॅन ही अभिनेत्री असून, सध्या ती भारतात वास्तव्यास आहे. स्वत:च्या देहाची अश्लील, विवस्र छायाचित्रे व चित्रफिती विविध माध्यमांतून प्रसिद्ध करून तिने अश्लीलतेचा प्रचार केला आहे. पाहणाऱ्यांच्या मनात विषयासक्ती निर्माण करण्याचा सनी लिआॅनचा हेतू आहे,’ अशा आशयाचा मजकूर (पान १० वर)तक्रारीत आहे.आंतरजालावर सनी लिआॅनचे स्वत:चे संकेतस्थळ असून, इतरही अनेक संकेतस्थळांवर तिची छायाचित्रे, चित्रफिती झळकतात. पाश्चात्त्य जगात ‘पोर्न स्टार’ म्हणूनच ज्ञात असलेल्या सनी लिआॅनच्या भारतातील पदार्पणाचा बराच गाजावाजा झाला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या असल्या, तरी ‘पोर्न स्टार’ हीच तिची प्रतिमा कायम राहिली असून, भारतातच वास्तव्याला असल्यामुळे तिच्याविरुद्ध ठिकठिकाणी तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. गेल्याच आठवड्यात डोंबिवली पोलीस ठाण्यात पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर आता दुसरी तक्रार साताऱ्यात दाखल झाली आहे.शाहूपुरी पोलिसांनी सनी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम २९२ आणि २९२ अ (अश्लील चित्र आणि छायाचित्र प्रदर्शित करणे), ‘इन्डिसेन्ट रिप्रेझेंटेशन आॅफ वूमन अॅक्ट’चे (स्रीच्या अशिष्ट प्रदर्शनास प्रतिबंध करणारा कायदा) कलम ३ व ४, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पिसाळ तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
सनी लिआॅनविरुद्ध साताऱ्यात गुन्हा
By admin | Updated: May 27, 2015 01:18 IST