नाट्यमय अटक : सहा गुन्हे उघडकीस नागपूर : सराईत बॅगलिफ्टर राज ऊर्फ रोहित सुनील वाहणे (रा. संजयनगर) याला अंबाझरीत पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांसह नाट्यमयरीत्या अटक केली. त्याच्याकडून बॅगलिफ्टिंगचे दहा गुन्हे उघडकीस आले असून, आणखी अनेक गुन्हे उजेडात येण्याची शक्यता पोलीस वर्तवीत आहेत.दुचाकीने एकट्या जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करायचा, संधी मिळताच तिच्या दुचाकीला किंवा खांद्याला अडकविलेली पर्स हिसकावून घ्यायची आणि सुसाट वेगाने पळून जायचे, अशी आरोपी राज आणि त्याच्या साथीदारांची पद्धत आहे. अशाप्रकारचे शहरात अनेक गुन्हे घडले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्याही हद्दीत असेच दोन गुन्हे घडले. गुन्ह्याची पद्धत पाहून पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार आणि अंबाझरीचे ठाणेदार अनिल कातकडे यांनी आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या भागात सापळे रचले. त्यात राजचे दोन अल्पवयीन साथीदार पोलिसांच्या हाती लागले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस राजचा शोध घेत होते. सोमवारी तो पोलिसांना गवसला. त्याला बोलते केले असता त्याने अंबाझरी, प्रतापनगर, गिट्टीखदान आणि वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅगलिफ्टिंगचे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे चार महागडे मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली. त्याची ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली. त्याच्याकडून आणखी अनेक गुन्हे उघडकीस येतील, असा पोलिसांना विश्वास आहे. ठाणेदार अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चौधरी, हवालदार बावणे, तिवारी, शिपाई मधुकर, आसीफ, तेलेवार, प्रफुल्ल, रवी, दीपेंद्र यांनी ही कामगिरी बजावली.(प्रतिनिधी)गोवा, मुंबईची सफरआरोपी राज याला मोठ्या शहरात जाऊन मौजमजा करण्याची भारी हौस आहे. गुन्हा केल्यानंतर मिळालेला ऐवज विकून तो मुंबई किंवा अन्य मोठ्या महानगरातून फिरून येतो. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे त्याने हात मारल्यानंतर थेट गोवा गाठले. तेथे मौजमजा केल्यानंतर सोमवारी तो नागपुरात परतला. त्याने आपल्या साथीदारांना बसथांब्यावर येण्याचे सांगितले होते. मात्र, साथीदारांसोबतच तेथे अंबाझरीचा पोलीस ताफाही होता. बसमधून उतरताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.
सराईत बॅगलिफ्टर गजाआड
By admin | Updated: November 5, 2014 00:52 IST