अहमदनगर : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या काळात बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कैदी तथा अभिनेता संजय दत्तला दिलेली ‘फार्लो’ (संचित रजा) कायदेशीरच असल्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, अभिनेता म्हणून संजय दत्तलाच ही सवलत दिली नसून त्याच्यासोबत अन्य २५ कैद्यांनाही फार्लो मंजूर झाली आहे. अभिनेता असल्याने संजय दत्तला तुरुंग प्रशासनाकडून सवलत दिली जात आहे काय ?, याची मी स्वत: चौकशी केली आहे. शनिवारी मुंबईत तुरुंग प्रशासन, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेतली असून फार्लो रजेच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेतली. दत्त याच्या रजेबाबत आधीचा अहवाल स्वयंस्पष्ट नव्हता. याची चौकशी झाल्यानंतर पुन्हा फेरप्रस्ताव सादर केला. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने स्वयंस्पष्ट अहवाल दिला. तो प्रस्ताव परिपूर्ण होता. संजय दत्त याने अर्ज केल्यानंतर २२ दिवसांनी त्याचा १४ दिवसांच्या रजेचा अर्ज मंजूर झाला. त्याच्यासह २५ कैद्यांनाही फार्लोंतर्गत रजा दिली आहे. प्रशासनाकडे आठ अर्ज प्रलंबित होते. त्यावरही शनिवारी निर्णय झाला आहे. पॅरोल आणि फार्लो हे दोन वेगळे विषय आहेत. यामध्ये तुरुंग आणि पोलीस प्रशासनाने काहीच गैर केलेले नसल्याचे स्पष्ट झालेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
संजय दत्तची रजा कायदेशीरच !
By admin | Updated: December 30, 2014 11:51 IST