ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ६ - मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची २७ फेब्रुवारी रोजी तुरूंगातून सुटका होणार असल्याचे वृत्त आहे. गृहमंत्रालयाने संजयच्या सुटकेला हिरवा कंदील दाखवल्यामुळे तो १०५ दिवस आधीच तुरुंगातून सुटणार आहे. चांगल्या वर्तणुकीमुळे त्याची तुरुंगातून लवकर सुटका होणार असल्याचे समजते.
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र या खटल्याचे कामकाज सुरू असताना त्याने १८ महिने तुरूंगात काढल्यामुळे त्याला साडेतीन वर्षांचा कालावधी तुरूंगाता काढावा लागणार होता. मे २०१३मध्ये संजय दत्तची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. अखेर आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस त्याची तुरूंगाची सुटका होणार असल्याचे समजते.