मुंबई : युतीमध्ये धुसफूस रंगली असताना वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदावर समाधान मानत भाजपाने स्थायी समितीवर शिवसेनेचे यशोधर फणसे यांना आज निवडून आणले. मात्र अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच फणसे यांनी जकातकराला पर्याय मिळेपर्यंत भाजपाने सुचविलेल्या वस्तू व सेवा कराला अप्रत्यक्ष विरोध दर्शविला आहे.मित्रपक्ष भाजपाने साथ दिल्यामुळे सात मताधिक्यांनी शिवसेनेचे फणसे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार वकारुन्नीसा अन्सारी यांना पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीत मनसेचे सदस्य गैरहजर तर समाजवादीचे सदस्य तटस्थ राहिले.फणसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत जकात कर रद्द करण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शविला. वस्तू व सेवा कर आणण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे.परंतु पालिकेचे ४० टक्के उत्पन्न हे जकात करातून उभे राहत असते. त्यामुळे जकात कराला पर्यायी करप्रणाली मिळेपर्यंत हा कर टिकवून ठेवण्याची सूचना प्रशासनाला करीत फणसे यांनी भाजपालाच आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सेनेचे फणसे
By admin | Updated: April 7, 2015 04:49 IST