जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणारे तलाठी व त्यांच्या अन्य दोन सहकाऱ्यांच्या अंगावर डंपर नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शिरसोली-मोहाडी रस्त्यावर घडली.पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून डंपर मालक संजय आसाराम कोळी (रा. वडगाव) यास अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार अल्पवयीन असल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे तर एक जण फरार झाला आहे.म्हसावद गावच्या परिसरातील वाळूच्या तस्करीबाबत तक्रारींवरुन तलाठी जी. डी. लांबाळे, आर.टी.वंजारी, के. एम. बागुल हे पेट्रोलिंगवर असताना रविवारी पहाटे कांताई बंधाऱ्याजवळ संजय आसाराम कोळी, धनराज कोळी व अन्य एक जण डंपरमधून चोरटी वाळू नेत असल्याचे आढळून आले. त्यांना अडवून थांबण्यास सांगितल्यावर दोघांनी पथकातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यांनतर पळून जाण्याच्या तयारीत त्यांनी डंपर थेट कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातला, मात्र सुदैवाने पथकातील कर्मचारी बचावले.(प्रतिनिधी)
तलाठ्याच्या अंगावर वाळूचा डंपर घातला
By admin | Updated: April 6, 2015 03:22 IST