कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड हा जामिनावर सुटल्यास, तो साक्षीदारांवर दडपण आणून त्यांना फितूर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद सरकारी वकील चंद्रकांत बुधले व तपास अधिकारी चैतन्या एस. यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर बुधवारी केला. त्यावर शुक्रवारी सुनावणी होईल.पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबरला आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीरवर दोषारोपपत्र दाखल झाले. पोलिसांनी ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केल्याने हा खटला या न्यायालयात चालू शकत नाही, असे सांगत डांगे यांनी तो जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. १३ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बिले यांच्यासमोर सुनावणी झाली. समीरने हा खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील निर्णयानंतर सुनावणी सुरू होईल, असे बिले यांनी सांगितले. समीरच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर तपास अधिकारी चैतन्या एस. यांनी अभिप्राय दिला. त्यामध्ये ज्योती कांबळे, अंजली गरकर, सुमित आमनकर यांच्या समीरशी झालेल्या मोबाइलवरील संवादावरून त्याचा पानसरेंच्या खुनाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता होऊ नये, असे सरकारी वकील अॅड. बुधले यांनी सांगितले. समीरचा रुद्र पाटीलशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पाटील हा फरार आहे. खटल्याचा निकाल होईपर्यंत समीरला जामिनावर सोडू नये, असा युक्तिवाद त्यांनी केला. (प्रतिनिधी)
समीरचा जामीन फेटाळण्याची मागणी
By admin | Updated: January 21, 2016 03:35 IST