सांगली : भाजपाने अखेर सांगलीचे विद्यमान आमदार संभाजी पवार व जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांची उमेदवारी कापली. भाजपातर्फे सांगलीतून शहराध्यक्ष सुधीर गाडगीळ तर जतमधून विलासराव जगताप यांच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. या घडामोडीनंतर पवार यांचे पुत्र पृथ्वीराज यांनी आता शिवसेनेकडून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी पवार घराण्याने शिवसेना-जनता दल-भाजपा आणि पुन्हा शिवसेना असे वर्तुळ पूर्ण केले आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांना उमेदवारी देण्यास संभाजी पवार यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी पाटील यांच्या प्रचारात सहभागी न होता हातकणंगलेतील महायुतीचे उमेदवार राजू शेट्टी यांचा प्रचार केला होता. सांगलीत त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी खा. पाटील आणि निष्ठावंत गटाने केल्या होत्या. उमेदवारीचा तिढा सोडविण्यासाठी भाजपाने समिती नेमली होती. या समितीच्या सूचनेनुसार पवार यांच्याऐवजी गाडगीळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी याबाबतचे वृत्त येऊन धडकताच संभाजी पवार समर्थकांनी कार्यालयावरून पक्षाचे फलक, बॅनर उतरवले. पोस्टर्स फाडले. पवार यांनी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला. उद्धव यांनी पवार यांचे पुत्र पृथ्वीराज यांच्या नावाला होकार दर्शविला. शनिवार शिवसेनेतर्फे त्यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. दुसरीकडे भाजपाने जतचे आमदार प्रकाश शेंडगे यांचाही पत्ता कट केला. त्यांच्या जागी राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झालेल्या विलासराव जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (प्रतिनिधी)
संभाजी पवार, प्रकाश शेंडगेंचे तिकीट कापले!
By admin | Updated: September 27, 2014 05:06 IST