ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - हिट अँड रन प्रकरणी सत्र न्यायालयाने सलमान खानला ठोठावलेल्या पाच वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सलमानला दिलासा मिळाला असून त्याची 'तुरुंग'वारी टळली आहे. सध्या सलमान जामीनावर बाहेर राहणार असून सत्र न्यायालयाकडूनच जामीनाची मुदत वाढवून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका झाली आहे. दरम्यान सलमानला कोर्टात त्याचा पासपोर्ट जमा करावा लागणार असून प्रवासासाठी त्याला कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस व चौघा जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने बुधवारी सलमानला दोषी ठरवून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याला दोन दिवसांचा जामीन मंजूर केला होता. या जामीन अर्जावर आज सविस्तर सुनावणी झाली. अमित देसाई यांनी सलमानची तर संदीप शिंदे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
सलमानवर लावण्यात आलेला सदोष मनुष्यवधाचा आरोप चुकीचा असून कोणालाही मारण्याचा त्याचा हेतू नव्हता असा युक्तीवाद सलमानच्या वकिलांनी केला. तसेच अपघातावेळी गाडीत चारजण उपस्थित होते, त्यापैकी कमाल खानची साक्ष नोंदवण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गाडीचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचा मुद्दाही निकाल देण्यापूर्वी विचारात घेण्यात आला नसल्याचा युक्तिवाद सलमानच्या वकिलांनी केला. सलमान सेलिब्रिटी असल्याने त्याच्याबाबत दुजाभाव करून त्याला तुरुंगात डांबण्यात येऊ नये, असेही अमित देसाई यांनी म्हटले.
मात्र या खटल्यातील साक्षीदार असलेल्या रविंद्र पाटीलने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये गाडीत फक्त तीनच व्यक्ती असल्याचे नमूद केले होते, त्यामुळे कमाल खानची साक्ष नोंदवण्याचा प्रयत्न झाला नाही असे सरकरी वकील संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले.
सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्याने व हा खटला उच्च न्यायालयात आल्याने दोषीला जामीन मिळू शकतो. पण त्याला जामीन मिळू नये यासाठी सरकारी पक्षाकडे काही विशेष मुद्दा आहे का , असा सवाल न्यायालयाने विचारले असाता आपल्याकडे तसे मुद्दे असल्याचे संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती देत या खटल्याची उच्च न्यायालयात नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालय जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत सलमानला जामीन देण्यात आला. या खटल्याची पुढील सुनावणी १५ जूनपासून होणार आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सलमान खान जामीनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सत्र न्यायालयासमोर हजर झाला. नियमानुसार औपचारिकता म्हणून सलमान कोर्टासमोर शरण आला. यानंतर त्यांनी जामीन अर्जावर स्वाक्षरी केली. ३० हजार रुपयांचा बॉँड सादर केल्यावर त्याची जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाली. अवघ्या १० मिनीटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली.
देशात गरीबांना न्याय मिळत नाही - सत्यपाल सिंह यांची उद्विग्न प्रतिक्रिया
देशात गरिबांना न्याय मिळत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी सलमानच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याबद्दल नाराजी नोंदवली. 'पैशाच्या जोरावर श्रीमंत लोक न्यायव्यवस्थेच्या हातावर तुरी देतात' असेही ते म्हणाले
सत्र न्यायालयाने सलमानला शिक्षा ठोठावल्यानंतर जनसामान्यांचा न्यायाव्यवस्थेवर विश्वास बसला पण उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्या विश्वासाला पुन्हा तडा गेला अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.