- ग्राहक पंचायतचा आरोप : अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावेनागपूर, दि. ३० - रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर आणि रेल्वेत विक्रेते पाण्याच्या बॉटल्स, शीतपेय, खाद्यपदार्थ आणि पॅकेटबंद वस्तू एमआरपीपेक्षा जास्त भावाने विक्री करून ग्राहकांची सर्रास लूट करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केला असून रेल्वे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. रेल्वे आणि स्थानकावर प्रवाशांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे एमआरपीपेक्षा जास्त भावाने पाण्याची बॉटल, शीतपेय, खाद्यपदार्थ आणि पॅकबंद वस्तू विकत घ्यावे लागतात. त्याचा फायदा घेऊन प्रवाशांची सर्रास लूट होत आहे. ही वस्तूस्थिती असून याकडे रेल्वे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. टीसी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास टोलवाटोलवीचे उत्तर मिळतात, याकडे अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी लक्ष वेधले आहे. रेल्वेत बाहेरील विक्रेत्यांना वस्तूंची विक्री करण्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. तसेच बाहेरील विक्रेत्यांमुळे आणि विनातिकिट प्रवाशांमुळे आरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह असून प्रवाशांचे मौल्यवान दागिने आणि वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार सतत वाढत आहेत. याकडेही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ज्यावेळी मुख्य अधिकारी रेल्वेस्थानक किंवा रेल्वेमध्ये आकस्मिक भेटी देतात तेव्हा सर्व आलबेल दिसते किंवा तसे भासवले जाते. पण अन्य वेळात प्रवाशांची सर्रास लूट केली जाते. रेल्वे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांची लूट थांबवावी आणि सुरक्षा द्यावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे.
रेल्वेत एमआरपीपेक्षा जास्त भावाने विक्री
By admin | Updated: June 30, 2016 16:18 IST