मुंबई : साकीनाका परिसरात बुधवारी रात्री नऊ वाजता खंडित झालेला वीज पुरवठा पंधरा तासांनी पूर्ववत झाल्याने साकीनाका-काजूपाडा परिसरातील रहिवाशांचे हाल झाले. वीज ग्राहक केंद्रानेही ही समस्या फारशी गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे रहिवाशांचा संताप अनावर झाला.बुधवारी रात्री नऊच्या सुमारास साकीनाका-काजूपाडा परिसरातील रिलायन्स वीज कंपनीचा वीज पुरवठा खंडीत झाला. यावर रहिवाशांनी याबाबतची तक्रार कंपनीच्या वीज ग्राहक केंद्राकडे केली. एक तासाने वीज पुरवठा पूर्ववत होईल, असे केंद्राकडून सांगण्यात येत असताना वीजपुरवठा पूर्ववत होण्यास तब्बल पंधरा तास लागले. अकरा हजार व्होल्टचा बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाल्याचे केंद्राच्या वतीने रहिवाशांना सांगण्यात आले. परंतु ही पहिलीच वेळ नाही. साकीनाका आणि काजूपाडा परिसरात विजेचा लपंडाव नेहमीच सुरू असतो, असे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले. विशेषत: एवढा मोठा बिघाड असतानाही एक तासाने वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत असल्याने रहिवाशांचा पारा आणखीच चढला होता. परिणामी येथील विजेच्या समस्येबाबत कायमस्वरुपी उपाययोजना आखावी, अशी मागणी स्थानिकांनी या घटनेनंतर केली आहे. (प्रतिनिधी)
साकीनाका परिसर १५ तास अंधारात!
By admin | Updated: September 12, 2014 02:49 IST