प्राची सोनवणे,
नवी मुंबई- हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील महिला प्रवाशांची छेड काढण्याच्या व डब्यात घुसून मोबाइल हिसकावण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. रात्री डब्यात व रेल्वे स्टेशनमध्ये पोलीसच नसल्याने चोरट्यांचा व गर्दुल्ल्यांचा धुमाकूळ सुरू आहे. जुलैमध्ये छेडछाडीच्या पाच घटना घडल्या असून, महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे. हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांना धर्मशाळेचे स्वरूप येऊ लागले आहे. चोरटे, गर्दुल्ले व इतर समाजकंटकांचा वावर वाढला आहे. रात्री महिलांच्या डब्यामध्ये बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी असणे बंधनकारक आहे. परंतु जवळपास एक महिन्यापासून रात्री १० नंतर पोलीस कर्मचारीच उपलब्ध नसतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवरही पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षक नसतात. यामुळे महिलांच्या डब्यामधून गर्दुल्ले व टपोरी प्रवास करीत आहेत. अनेक वेळा ट्रेन स्टेशनमध्ये थांबली की चोरटे डब्यात येतात व महिलांच्या हातामधील मोबाइल घेऊन पळ काढत आहेत. याशिवाय महिलांच्या डब्यामध्ये पुरुष फेरीवालेही दिवसभर फिरत असतात. जुलै महिन्यामध्ये महिलांची छेड काढल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. कोपरखैरणेतील शाळेतील स्कूलबसच्या चालकाला छेडछाडी, अश्लील चाळे करण्याप्रकरणी अटक केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. विशेषत: कोपरखैरणे आणि सानपाडा या ठिकाणी छेडछाडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर रात्री ९ वाजेनंतर गर्दुल्ले, भिकारी, रोडरोमीओ वावरताना दिसतात. या परिसरातच खुले आम दारूच्या पार्ट्या होत आहेत. परिसरातील पथदिवेही बंद असल्याने संधीचा फायदा घेत या ठिकाणी अनेक गैरप्रकार होतात. महिला डब्यात पोलीस कर्मचारी नसतानाचा फायदा घेत अनेक माथेफिरूंनी महिलांवर अत्याचार तसेच हल्ला करण्याचा प्रयत्न यापूर्वी केला आहे. पोलिसांनी दोन वर्षांत दोन हजार ६१५ पुरु षांना महिला डब्यातून प्रवास केल्याने इंगा दाखविला. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये ऐरोली ते बेलापूर मार्गावर ७४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पोलीस नियमितपणे कारवाई करीत असूनही हे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. ।हेल्पलाइनचाही उपयोग नाहीमहिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. परंतु १८ जुलैला रात्री धिंगाणा घालणाऱ्या गर्दुल्ल्याची तक्रार करण्यासाठी डब्यातील प्रवासी पद्मावती जावळे यांनी हेल्पलाइनवर संपर्क केला, परंतु त्या नंबरवर काहीच प्रतिसाद मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रेल्वे व पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली आहे. । डब्यात शिरून मोबाइल हिसकावला बेलापूरमध्ये राहणाऱ्या भारती शेंडे (बदललेले नाव) या १९ जुलैला कुर्ल्यावरून बेलापूरला जाणाऱ्या ट्रेनने प्रवास करीत होत्या. रात्री एक वाजण्याच्या सुमारास वाशी स्टेशनमध्ये ट्रेनचा वेग कमी होताच चोरट्याने महिलांच्या डब्यात उडी मारली व काही क्षणांत हातामधील मोबाइल हिसकावून पळ काढला. याविषयी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, अशाप्रकारच्या घटना नियमित होत आहेत. ठोस उपाययोजना करणारवाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद ढावरे यांनी दोन महिन्यांमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या व महिलांची छेड काढणाऱ्यांवर कारवाईसाठी ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक प्लॅटफार्मवर पोलीस तैनात करता येत नाहीत. उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त कारवाई करून घेतली जात आहे.