अभिनेत्री प्राची देसाईशी खास संवाद विहंग सालगट - नागपूर ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ किंवा ‘बोल बच्चन’ सारखा चित्रपट असो, प्राची देसाई रसिकांच्या लक्षात राहिली. टी. व्ही. मालिका ‘कसम’ मधून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला प्रारंभ करणारी प्राची सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीची ब्रँड अॅम्बेसडरही राहिली आहे. अर्थातच त्यामुळे तिची त्वचा नेहमीच चर्चेत राहिली. तिच्यासारखीच आपलीही त्वचा राहावी, असे सध्या प्रत्येकच युवतीला वाटते. लोकमत समूहातर्फे आयोजित धमाल दांडिया कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती नागपुरात आली असता तिने लोकमतशी खास संवाद साधला. प्राची म्हणाली, अनेकदा आपल्याला निसर्गाकडूनच बरेच काही मिळत असते. यासाठी मी ईश्वराला धन्यवाद देते. मला फक्त त्याची थोडी काळजी घ्यावी लागते. सतत फ्रेश दिसण्यासाठी मी प्रयत्न करते. पण प्रत्येकच मुलगी माझ्यासारखी त्वचा थोड्याशा काळजीने ठेवू शकते. त्यात फारसे कठीण नाही. त्वचेसोबत मी प्रयोग करीत नाही. पण त्वचा चांगली राखण्यासाठी खूप पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय चांगले आणि दर्जेदार अन्न खायला हवे. खूप तेलकट पदार्थांचा उपयोग मी टाळते. काही कारणाने तेलकट खावे लागले तर खूप पाणी पिते. अधिकाधिक फळांचे सेवन मी करते. फळ कुठलेही असो ते त्वचेसाठी चांगलेच असते. मला आधीपासूनच अभिनयात आवड होती. सोबतच मानसशास्त्र विषयाचीही आवड होती. पण संधी मिळाली आणि अभिनयात आले. पुण्यात इयत्ता १२ वीत शिकत असताना तेथे मॉडेलिंगची एक कार्यशाळा झाली. तेथे एका दूरचित्रवाहिनीच्या मालिकेची आॅडिशन दिली. त्यात माझी निवड करण्यात आली आणि मला ब्रेक मिळाला. मी याचा विचारही केला नव्हता. त्यावेळी ‘झलक दिखला जा’ ही मालिका करीत होते. त्याच काळात मला ‘रॉक आॅन’ सिनेमासाठी बोलाविणे आले. मला वाटले कुणीतरी माझी गंमत केली. त्यामुळे मी तो फोन फारसा गांभीर्याने घेतला नाही. नंतर फरहान अख्तर यांच्याशी भेट झाली. त्यांची मी फॅन होतेच. त्यात नंतर मला संधी मिळाली. यात फरहान अख्तर, अजय देवगण आणि संजय दत्त यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. प्रत्येकासोबत काम करण्याचा अनुभव वेगळा होता. पण पोलिसगिरी आणि वन्स अपॉन टाइम सारखे चित्रपट खूप वेगळे होते. अभिषेक बच्चन खूप खोडसाळ आहे तर फरहान सर्जनशील आहे. अजय देवगण गंभीर आहे पण नेहमी कुणाची तरी खोडी करण्याच्या तो प्रयत्न करीत असतो. हे वर्ष माझ्यासाठी जरा शांत आहे. यंदा माझी कुठलीही फिल्म रिलिज होऊ शकली नाही. यापूर्वी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नागपूरला आले होते. येथील रसिक खूप चोखंदळ असल्याचे मला माहीत आहे. दांडिया मी कॉलेजमध्ये असताना खेळला होता. त्यानंतर मात्र संधी मिळाली नाही पण संधी मिळाली तर दांडिया खेळायला मला खरेच आवडेल. मला बहुतेक हॉलिवूडचे चित्रपट आवडतात. पण मला स्वत:चे चित्रपट कुठले आवडतात म्हणाल तर ‘रॉक आॅन’ किंवा ‘वन्स अपॉन अ टाइम’ चे नाव मी घेईल.
चाहत्यांना भेटता न येण्याचे दु:ख मलाच जास्त
By admin | Updated: November 30, 2014 00:58 IST