सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत जुळलेले कदम-दादा घराण्यातील सूर आता महापालिकेच्याच राजकारणामुळे बिघडले आहेत. पतंगराव कदम यांनी गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा एकूणच कारभार समाधानकारक नसल्याचे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मदन पाटील कुठे आहेत? ते काय करतात, याची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगून त्यांनी त्यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी पतंगराव कदम यांच्यावर उघड टीका केली होती. त्यानंतर विश्वजित कदम व प्रतीक पाटील यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती. दीड वर्षापूर्वी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने वसंतदादा व कदम घराणे एकत्रित आले होते. राष्ट्रवादीच्या विरोधात एकत्र लढून त्यांनी महापालिकेचा गड जिंकला होता. कॉँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावेळी सांगलीचा हा एकीकरणाचा पॅटर्न चर्चेत आला होता. सत्ता स्थापनेला दीड वर्ष होण्याआधीच या एकीकरणाचे तीन-तेरा झाले आहेत. विधानसभा निवडणूक काळात प्रतीक पाटील व पतंगराव यांच्यात वाद निर्माण झाला होता, तरीही पतंगराव व मदन पाटील यांचे सूर जुळलेलेच होते. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता महापालिकेच्या कारभारावरून दोन्ही घराण्यांमधील एकीकरणाचे विणलेले धागे आता सुटू लागले आहेत. मदन पाटील व महापालिकेवर नाराजी व्यक्त करताना पतंगराव म्हणाले की, सत्ता स्थापनेनंतर महापालिकेची सर्व सूत्रे मदन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. महापालिकेच्या कारभाराकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे होते. लोकांना जर शुद्ध पाणी, चांगले रस्ते आपणाला देता येत नसतील, तर ही गोष्ट दुर्दैवी आहे. लोकांच्या हितासाठी आम्ही महापालिका निवडणुकीत एकत्र आलो होतो. मोठ्या कष्टाने ही निवडणूक लढवून सत्ता मिळविली आहे. त्यामुळे लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी कॉँग्रेसची आहे. यामध्येही गटनेते किशोर जामदार व मदन पाटील यांची जबाबदारी अधिक आहे, असे त्यांनी सांगितले. एकूणच कारभाराबद्दल त्यांनी व्यक्त केलेली नाराजी ही मदन पाटील यांच्या दिशेने गेली आहे. (प्रतिनिधी)मदन पाटील यांचे मौनविधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या नेत्यांमधील वादाबाबत तसेच महापालिकेच्या राजकारणाबाबत मदन पाटील यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची व पतंगरावांची भेटही झालेली नाही. पतंगरावांची टीकालोकहिताची कामे होणार नसतील तर महापालिका बरखास्त केली पाहिजेदूषित पाणी मिळत असतानाही सांगलीचे लोक राहतात तरी कसे, याचे आश्चर्य वाटते.गटनेते, नेते काय करीत आहेतत्यांच्याकडेही पराभवाची विचारणा...लोकसभा निवडणुकीत पक्षाला याठिकाणी मोठा पराभव पत्करावा लागला होता, मात्र विधानसभेत सांगलीत विजयाची खात्री होती. तरीसुद्धा मदन पाटील यांचा पराभव का झाला, याची कारणीमीमांसा करणार आहे. मदन पाटील यांनाही याबाबत विचारणा करणार आहे. जिल्ह्यातील अशा सर्वच मतदारसंघात पराभवाची कारणे शोधण्यात येणार असून आता खरे कवित्व बाहेर येईल, असे कदम म्हणाले.
कदम-दादा घराण्यातील सूर बिघडले
By admin | Updated: December 4, 2014 23:38 IST