पुणे : माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘एफटीआयआय’च्या आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले असून, नवनियुक्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी मंत्रालयाकडे करणार असल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधी राकेश शुक्ला याने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.‘एफटीआयआय’ (फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्युट आॅफ इंडिया) नियामक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा मंगळवारी १९वा दिवस होता. आंदोलनाची दखल अखेर केंद्र शासनाकडून घेण्यात आली असून, शुक्रवारी नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत. शिष्टमंडळात सात माजी तर तीन आजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. माजी विद्यार्थ्यांमध्ये गिरीश कासारवल्ली, रसुल पोकुट्टी, परेश कामदार, बीना पॉल, फरिदा मेहता, धरम गुलाटी, प्रतीक वत्स तर हरिशंकर नचिमुथ्थु, विकास अर्स, सीमा कौर या सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.सरकारच्या प्रतिसादावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असून, तूर्त आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका असल्याचे विकास अर्स याने सांगितले. चौहान यांना राजकीय विचारप्रणाली आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यांवर आमचा विरोध आहे. संस्थेला मार्ग दाखवणारी व्यक्ती नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडली जावी. एफटीआयसारख्या संस्थांच्या नियामक मंडळावर नियुक्ती करताना कोणते निकष लावण्यात येतात, हे मंत्रालयाला विचारणार आहोत. संबंधित निकष सदोष वाटल्यास आमच्या दृष्टीने योग्य असलेले निकष त्यांना सुचवू, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एफटीआय मंडळ बरखास्त करा!
By admin | Updated: July 1, 2015 03:25 IST