यदु जोशी, मुंबईसरकार बदलले तरी आमची कामे होत नाहीत, काही मंत्री तर आमच्याकडे पाहातही नाहीत, अशा तक्रारी सत्ताधारी भाजपाचेच आमदार करीत असून या निमित्ताने त्यांच्या मनातील खदखद प्रकर्षाने समोर आली आहे. मुंबईत अलिकडे भाजपाच्या आमदारांचा अभ्यासवर्ग झाला तेव्हा अनेकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. तहसिलदार, बीडीओ, एसडीओ, सीईओही आमचे ऐकत नाहीत. आपल्याच पक्षाचे मंत्री आम्हाला सन्मान देत नाहीत. आम्ही गेलो तर साधी दखलही घेत नाहीत, असा सूर आमदारांनी लावला. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले तेव्हा विधानभवन परिसरातही या तक्रारींची चर्चा होती. विदर्भातील एका आमदाराने सडेतोड भाषण दिल्यावर अनेक आमदारांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. तेव्हा गडकरी यांनी आमदारांना चांगलेच सुनावले. ‘तुम्ही बोलताय हे ठीक आहे; पण अशा टाळया वाजविण्याची आपल्याकडे पद्धत नाही. तक्रारी असतील तर त्या दूर होतील, असे ते म्हणाले. मतदारसंघात दुष्काळग्रस्त, अवकाळीग्रस्त शेतकरी मदत कधी मिळणार म्हणून विचारतात त्यांना काय सांगायचे? आमदारांचेच पगार तीन महिन्यांपासून झालेले नाहीत, अशी व्यथा एका आमदाराने मांडली.
सत्ताधारी आमदारांमध्ये खदखद!
By admin | Updated: March 10, 2015 01:52 IST