- गजानन दिवाण, औरंगाबादराज्यभरातील आंतरजिल्हा बदल्या रखडलेल्या असतानाच आदिवासी जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बाबतीत मात्र नियमांना हरताळ फासला गेला आहे. तीन वर्षांत बदलीचा नियम असतानाही १०-१० वर्षांपासून हे शिक्षक एकाच जिल्ह्यात अडकून पडले आहेत. आदिवासी जिल्ह्यात तीन वर्षे नोकरी केल्यानंतर प्राधान्याने आवडीच्या ठिकाणी बदली करावी, असा शासकीय नियम सांगतो. मात्र, कोणत्याही आदिवासी जिल्हा परिषदेकडून या नियमाचे पालन होत नाही. एकदा या जिल्ह्यात शिक्षक रूजू झालाकी, बदलीसाठी कोणीच विचारत नाही. अंबरनाथ जिल्ह्यातील एका शिक्षकाची पत्नी गोंदिया जिल्ह्यात नोकरी करते. त्यांचा मुलगा आणि आई-वडील पुण्यात राहतात. गेल्या आठ वर्षांपासून हा असाच संसार सुरू आहे. मूळचे अकोला जिल्ह्यातील एक शिक्षक १३ वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील किनवट भागात कार्यरत आहेत. २००९पासून त्याचे वडील आपल्या मुलाच्या बदलीची वाट पाहत होते. २०१२मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जवळ कोणीच नसल्याने दवाखान्यातही नेता आले नाही. आॅगस्ट २००९ला त्यांनी एनओसी दाखल केली आहे. त्यांच्याच जात प्रवर्गातील एका मित्राची एका वर्षात अकोल्याला बदली झाली, हे विशेष!पाणी नाही, वीज नाही, मोबाईल नेटवर्क तर विचारायलाच नको. अशा स्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील एका अतिदुर्गम शाळेत गेल्या सहा वर्षांपासून एक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांची पत्नी जळगाव जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. आई, पत्नी आणि लहान मुलगा जळगावात राहतात. जागा रिक्त असूनही जळगाव जि. प. त्यांना स्थान देत नाही.कटू अनुभवसातारा जिल्ह्यातील एक शिक्षक १० वर्षांपासून कुटुंबापासून दूर पालघर जिल्ह्यात कार्यरत आहे. रत्नागिरीचा एक शिक्षक गडचिरोली जिल्ह्यात सात वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात, आई-वडील रत्नागिरीला आहेत. अशा अनेक शिक्षकांचा कुटुंबगाडा डळमळीत झाला आहे. नोकरी मिळत नाही, म्हणून धडपड करायची. मिळेल त्या ठिकाणी रूजू व्हायचे. नंतर मात्र कुटुंबापासून दूर असे कुठल्या तरी दुर्गम भागात वर्षानुवर्षे काढायची, अशी स्थिती अनेकांची आहे.
शिक्षकांच्या बदल्यांबाबत नियमांना हरताळ
By admin | Updated: October 23, 2015 03:02 IST