मुंबई : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील एकूण ३० उपनगरीय रेल्वे स्थानके दत्तक घेण्याची घोषणा रोटरी क्लबने केली आहे. १ जुलैपासून क्लबचे नवीन वर्ष सुरू होते. या नव्या वर्षातील संकल्प म्हणून पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनासोबत मिळून हा उपक्रम हाती घेतल्याचे रोटरी क्लबचे मुंबई डिस्ट्रिक्ट कलेक्टर गोपाल मंधानिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मुंबई जिल्ह्यात रोटरी क्लबचे ८० क्लब्स असून, ५ हजार सदस्य आहेत. त्यांच्यामार्फत मुंबईत एक हजार प्रकल्प राबविण्याची इच्छा क्लबचे जिल्हाधिकारी गोपाल राय मंधानिया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, नववर्षानिमित्त क्लबच्या सदस्यांनी मुंबईतील विविध २५ ठिकाणी एकाचवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून क्लबने २ हजार ५०० रक्तपिशव्यांचे संकलन केले आहे. मधुमेहाविषयी जागरूकता आणि त्यावरील नियंत्रण, शौचालयांची उभारणी, बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि रेल्वे स्थानकांना दत्तक घेण्याचे चार महत्त्वाचे उपक्रम या वर्षी हाती घेण्यात येतील. आरोग्य, साफसफाई आणि स्वच्छतेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाला अनुसरून हे उद्दिष्टक्षेत्र निर्धारित केल्याचे मंधानिया यांनी सांगितले. परिणामी, येत्या वर्षभरात रोटरी क्लबतर्फे मुंबईत विविध ३०० शिबिरांद्वारे सुमारे १ लाख लोकांची मधुमेह तपासणी केली जाईल. त्यासाठी थायरोकेअर, टेराना, मुंबई महानगरपालिका, डी. वाय. पाटील, कूपर रुग्णालय आदींची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय आघाडीच्या रुग्णालयांशी सामंजस्य करार करत सुमारे ३०० बालकांच्या हृदय शस्त्रक्रियांचे नियोजन आहे. दरम्यान, मुंबईत २५० शौचालये उभारण्याचे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला चालना देण्यासाठी ३० उपनगरीय रेल्वे स्थानकांना दत्तक घेण्याची योजनाही तयार झाली आहे.>एक हजार प्रकल्पांचे उद्दिष्टजिल्ह्यातील प्रत्येक क्लबद्वारे नेत्र पेढी, त्वचा तंतू पेढी, गरीब मुलांच्या शिक्षणाचे प्रायोजकत्व, पाण्याच्या बंधाऱ्यांची उभारणी, व्यवसाय मार्गदर्शन मेळावे, गरिबांसाठी अन्य शैक्षणिक उपक्रम, शिष्यवृत्ती योजना, शारीरिक अपंगत्व असलेल्यांना मदत, वृक्ष लागवड, विविध देशांबरोबर सुरू असलेला रोटरी यूथ एक्सचेंज कार्यक्रम असे नानानिध उपक्रमही राबवले जातील. याआधी जुलै २०१५ ते जून २०१६ या कालावधीत रोटरी मुंबई डिस्ट्रिक्टने तब्बल ९०० प्रकल्प राबविले. त्यामुळे यंदा एक हजार प्रकल्प राबवण्याचे काम क्लब करणार आहे.
रोटरी क्लब घेणार ३० रेल्वे स्थानके दत्तक
By admin | Updated: July 4, 2016 02:37 IST