लोणी भापकर : बारामती तालुक्यात पावसाने दडी मारल्याने मेंढपाळवर्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील मेंढपाळ सध्या शेळ्या व मेंढरांसाठीच्या चारा व पाण्याच्या शोधार्थ बागायती तसेच शहराच्या आसपास कुटुंबकबिल्यासह भटकंती करीत आहेत. त्यातून मेंढरांसह कुटुंबातील लहान मुलांच्या आरोग्याच्या अडचणीत वाढ होत असल्याचे मेंढपाळवर्गातून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील पळशी, मासाळवाडी, मुर्टी, मोढवे, मुढाळे, लोखंडेवाडी, कानाडवाडी, सस्तेवाडी, मोराळवाडी, जोगवडी, वढाणे या भागात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका करणारी अनेक कुटुंबे आहेत. यातील अनेक कुटुंबांनी आपली शेती केवळ मेंढरांच्या चराईसाठी पडीक ठेवलेली आहे. याशिवाय डोंगरमाथ्याची जमीन पाझर तलाव व ओढ्या-नाल्यांची उपलब्धता यामुळे वर्षातील किमान आठ ते नऊ महिने शेळ्या-मेंढ्यांचे कळप स्थानिक परिसरातच सांभाळणे शक्य होते. परंतु, मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण खूपच घटल्याने येथील मेंढपाळ वर्गासाठी मेंढीपालन जिकिरीचे होत असल्याचे मत मुढाळे येथील मेंढपाळ सखाराम कारंडे यांनी व्यक्त केले. यावर्षी जूनमधील थोडीशी रिमझिम वगळता पावसाने पाठच फिरवली आहे. त्यामुळे परिसरातील माळरानं, जमिनी ओसाड दिसत आहेत. ओढे, नाले, पाझर तलाव कोरडे तर विहिरींनीही तळ गाठला आहे. शेळ्या-मेंढ्यांना चाऱ्याबरोबरच पाण्याचा प्रश्नही ऐन पावसाळ्यात गंभीर बनल्याने मेंढपाळवर्ग हतबल झाल्याचे चित्र आहे. बागायती भागातही पावसाअभावी मोकळ्या शेतात चरायला काहीच नाही. पाणी उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)>सध्या बहुतांश कळप बारामतीचा औद्योगिक भाग, विमानतळ, शहराभोवतालच्या मोकळ्या जागेत मेंढरं चरताना दिसत आहेत. परंतु चाऱ्याची उपलब्धता, स्थानिकांचा जाच व सुरक्षेचा अभाव यामुळे या कळपांना रोजच नव्या जागेत भटकावे लागत आहे. त्यातून पिण्याचे पाणी व अन्य अडचणी निर्माण होत असल्याने पालावरील लहान मुले आणि कळपातील मेंढरांच्या आरोग्याच्या अडचणीत वाढ होत असल्याने ‘कधी एकदाचा पाऊस पडतो आणि मेंढरांसह घर गाठतो’ अशी मेंढपाळवर्गाची अवस्था झाल्याचे कानाडवाडी येथील म्हस्कू टकले यांनी सांगितले.
बारामती तालुक्यात पावसाने दडी मारल्याने मेंढपाळांची भटकंती
By admin | Updated: July 31, 2016 01:23 IST