नवी मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे एमआयडीसीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. अशा रस्त्यांतून मार्ग करताना वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. त्याचा फटका परिसरातील औद्योगिक कंपन्यांना बसला आहे.एमआयडीसी क्षेत्रात तीन ते चार हजार लहानमोठे कारखाने आहेत. तर जवळपास दोन लाखांपर्यंत नोकरदार आहेत. त्यामुळे या परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. विशेषत: कच्च्या आणि पक्क्या मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठे आहे. यात मोठे ट्रक, टेम्पो, कंटेनर, टँकर तसेच खासगी वाहनांचा समावेश आहे. अशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या बाबतीत मात्र मोठ्या प्रमाणात उणिवा जाणवतात. उद्योगांना पूरक ठरणाऱ्या वीज, पाणी व रस्ते यंत्रणांचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे. रस्त्यांची तर पुरती वाताहत झाल्याने उद्योजकांनी चिंता व्यक्त केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांबरोबरच मुख्य रस्तेही पावसामुळे वाहून गेले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने दळणवळण यंत्रणा धीम्या पडल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने त्यात अपटून वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. चाकरमान्यांची तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एमआयडीसीच्या रबाळे, महापे, तुर्भे व नेरूळ परिसरातील रस्ते केवळ नावालाच उरले आहेत. याचा अप्रत्यक्ष फटका उद्योगांना बसल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.>महापालिका येथील उद्योजकांकडून वर्षाला शेकडो रुपयांचा कर वसूल करते. त्या बदल्यात महापालिकेने पायाभूत सोयीसुविधांची पूर्तता करणे अपेक्षित आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून महापालिका या क्षेत्रातून केवळ कर वसूल करते, परंतु सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याचा उद्योजकांचा आरोप आहे.
एमआयडीसीतील रस्त्यांची वाताहत
By admin | Updated: July 31, 2016 02:21 IST