मोहन भागवत : ‘व्यवस्थित जीवन, व्यवस्थित मन’ अंगिकारण्याचा सल्लानागपूर : आपल्या देशात धर्माला फार महत्त्व आहे. परंतु अनेकांना धर्म म्हणजे नेमके काय हे समजलेच नाही. धर्म चार चौकटीत बंद झाला आहे. मूळात केवळ पूजा आणि कर्मकांड म्हणजे धर्म नाहीच, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कर्मकांडाच्या नावावर धर्माचे अवास्तव स्तोम माजविणाऱ्या मंडळींवर त्यांनी शाब्दिक प्रहारच केला आहे. मंगळवारी न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनतर्फे आयोजित ‘स्व. एकनाथ रानडे-व्यक्ती व कार्य’या विषयावर बोलताना त्यांनी वरील विचार व्यक्त केले.धर्म हा कर्मकांडाने बांधलेला नाही. तर मनुष्याच्या आत्मिक सामर्थ्यावर विश्वास असणे म्हणजे धर्म आहे. याच्या माध्यमातून समाज व राष्ट्राचा विकास झाला पाहिजे. हेच आपल्या संस्कृतीचे प्राचीन व सनातन ध्येय आहे, असे सरसंघचालक म्हणाले. आपल्या देशात हिंदू देवदेवतांची निंदा करण्याचा प्रकार फार पूर्वीपासून चालत आला आहे. समाजातील गुंड प्रवृत्तींना संपविण्यासाठी हिंमत व शक्ती या दोन गोष्टी फार आवश्यक आहे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.यावेळी कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार व प्रेरणास्रोत एकनाथ रानडे यांच्या जीवनकार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. रानडे यांनी खडतर परिस्थितीला हिमतीने तोंड देत हे स्मारक उभारून दाखवले. व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व घडविण्यासाठी परिश्रमाची आवश्यकता असते व याचे मूळ भक्तीमध्ये आहे. याच भक्तीतून परिश्रमाची प्रेरणा घेऊन रानडे यांनी आयुष्यभर कार्य करत समाजासमोर प्रेरणा निर्माण केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजसेवा करण्यासाठी नवीन पिढीने स्वत:ला ऊर्जावान केले पाहिजे, असे ते म्हणाले. कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याने विवेक बाळगला पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित जीवन, व्यवस्थित मन हा मंत्र अंगिकारण्याची गरज आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी, विवेकानंद केंद्राचे विभागीय संघटक विश्वास लपालीकर, न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.अनंत व्यवहारे हे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कर्मकांड म्हणजे धर्म नाही
By admin | Updated: December 31, 2014 01:07 IST