मुंबई : बंदरांच्या विकासासाठी शासनाने सर्वंकष धोरण आखले असून, ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’च्या माध्यमातून विविध परवानग्या देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंतवणूकदारांना केले.गोरेगाव येथील मेरिटाइम इंडिया समिटमधील चर्चासत्रात ते बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत बंदर विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राला बंदर विकासाची समृद्ध परंपरा लाभली आहे. मुंबई देशाच्या सागरी विकासाचे केंद्र असून, येथे जागतिक दर्जाची जहाजे बांधली जातात. त्यामुळे राज्य सरकारने सर्वंकष असे बंदर विकास धोरण तयार केले आहे. इज आॅफ डुइंग बिझनेस या संकल्पनेवरील या धोरणामुळे राज्यात गुंतवणुकीला चालना मिळत आहे.सागरमाला प्रकल्पाबरोबरच राज्यातील बंदरे जोडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वाढवन बंदराच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत केंद्र सरकारशी करार झाला आहे. बंदरांच्या विकासातून अर्थव्यवस्थेला गती देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवीन बंदरांची निर्मिती, जेट्टींचा विकास, जहाजबांधणी आदी विविध विषयांबाबतचा आढावा घेताना गुंतवणूकदारांनी राज्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यापैकी ७ सामंजस्य करार महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे तर एक सामंजस्य करार एमटीडीसी आणि जेएनपीटीमध्ये होता. चर्चासत्रासाठी उद्योजक, गुंतवणूकदार, गोवा, कर्नाटक, गुजरात, केरळ या सागरीसीमा असलेल्या राज्यांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ब्रिक्स देशांमध्ये नवे पर्व सुरू होईलब्रिक्स देशांच्या शहरांमधील समस्या आणि आव्हाने ही जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे एकमेकांचे अनुभव आणि कल्पनांच्या देवाणघेवाणीतून शहरांचा विकास करणे अधिक सुलभ होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमध्ये अशा सहकार्याच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तीन दिवसीय ब्रिक्स मैत्री शहरे परिषदेत सहभागी झालेल्या रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्याचे आवाहन केले. राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून, उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधो उपलब्ध आहेत. तसेच औद्योगिकरणाला गती देण्यासाठी ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ची संकल्पना राबविण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटी योजना, नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण, नवीन बंदर धोरणांची माहिती दिली. दरम्यान, रशियाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना रशिया भेटीचे निमंत्रण दिले.
‘महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ’
By admin | Updated: April 16, 2016 02:08 IST