रवींद्र देशमुख, सोलापूरदेशातील असहिष्णू वातावरणाचे खापर केंद्र सरकारवर फोडून, साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले जात आहेत, पण सोलापुरातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. गो. मा. पवार आणि ख्यातनाम लेखक प्रा. निशिकांत ठकार यांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या भूमिकेवर असहमती दर्शविली आहे. साहित्य अकादमी ही स्वायत्त संस्था असून, सरकारशी तिचा संबंध नाही. त्यामुळे पुरस्कार परत करणे अर्थहीन आहे, असे मत या दोन मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. गो. मा. पवार हे १० वर्षे अकादमीच्या कार्यकारिणीचे सदस्य होते, शिवाय २००७ साली त्यांच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील चरित्र ग्रंथास अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. ‘केंद्राचा निषेध करण्यासाठी पुरस्कार परत करणे, केवळ सनसनाटी ठरू शकते, पण ते अर्थपूर्ण नाही. ही संस्था स्वायत्त आहे. पुरस्कारांची निवड करणाऱ्या समितीमध्ये देशातील विद्वानांचा समावेश आहे. सरकारचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसतो,’ असे त्यांनी सांगितले.‘काही साहित्यिकांनी राज्य शासनाचा पुरस्कारही परत करण्यास सुरुवात केली आहे, पण त्यांना मिळालेले पुरस्कार आधीच्या शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही चुकीची वाटते,’ असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.प्रा. ठकार यांनी हिंदीतील अनेक ग्रंथ मराठीत आणले आहेत. २०१४मध्ये त्यांना अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ते म्हणाले की, ‘यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. तेव्हा कुणी पुरस्कार परत केले नव्हते.’ साहित्य अकादमी ही संपूर्ण स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे पुरस्कार परत करण्याचे काहीच कारण नाही. (प्रतिनिधी)>> केंद्र सरकार प्रतिगाम्यांना पाठीशी घालत आहे, हे अद्याप सिद्ध व्हायचे आहे. ज्या घटना घडल्या, त्यांचा तपास सुरू आहे. कोणतेही सत्य बाहेर येण्याआधीच मत बनविणे चुकीचे आहे.- डॉ. गो. मा. पवार, ज्येष्ठ समीक्षकआपण आजही मोकळेपणाने बोलू शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कसलीच गदा आलेली नाही. ती जेव्हा येईल, तेव्हा निश्चित भूमिका घेणे योग्य ठरेल, असे मला वाटते.- प्रा. निशिकांत ठकार
पुरस्कार परत करणे अर्थहीन!
By admin | Updated: October 16, 2015 03:38 IST