मुंबई : राज्य शासनाने आज नोकरभरतीवर काही निर्बंध घातले असले तरी महसूल विभागातील लिपिकांची ५०४ तर तलाठ्यांची ८८७ अशी १ हजार ३९१ पदे पुढील महिन्यात भरण्यात येणार आहेत. नव्या आदेशानुसारच ही भरती केली जाणार आहे, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले.लिपिकांच्या पदांसाठी १२ जुलैला राज्यभर लेखी परीक्षा घेण्यात येईल. तलाठ्यांसाठीची परीक्षा १९ जुलैला होणार आहे. दोन्ही परीक्षांचा निकाल परीक्षेनंतर २४ तासात जाहीर करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी आज लोकमतला सांगितले. महसूल विभागात लिपिकांची ६५३९ पदे मंजूर असून त्यातील ६ हजार ३५ पदे भरलेली आहेत. तलाठ्यांची १२ हजार ६३७ पदे मंजूर असून त्यातील ११ हजार ७५० पदे भरलेली असून ८८७ रिक्त आहेत. एकनाथ खडसे हे आपल्याला अधिकार देत नसल्याचा मुद्दा राठोड यांनी मागे उपस्थित केला होता आणि त्यावरून वाद रंगला होता. आता राज्यमंत्री म्हणून त्यांच्या अधिकारात असलेल्या बदल्याही आपले कॅबिनेट मंत्री करीत असल्याची तक्रार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे समजते.
महसूल विभागात भरती सुरू!
By admin | Updated: June 4, 2015 04:30 IST