९० टक्के कर्मचारी संपावर : अधिकाऱ्यांवर ताणनागपूर : महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात नागपूर जिल्ह्यासह विभागातील ९० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याने, महसूल खात्यातील संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. या संपाचा सर्वाधिक फटका दैनंदिन कामकाजाला तर बसलाच, पण अधिकाऱ्यांचीही चागंलीच धावपळ उडाली. त्यांच्यावर स्वत: फाईल्स शोधण्याची वेळ आली. १ आॅगस्टपासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शनिवारी संपाचा दुसरा दिवस होता. नागपूर विभागात २३६५ मंजूर पदे आहेत. त्यापैकी शनिवारी २१९० कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. नागपूर जिल्ह्यातील एकूण ५१९ पैकी ४०० कर्मचारी संपावर होते. पहिल्या सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणे देण्यात आली. त्यानंतर या झाडाच्या खालीच कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला. शनिवारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य होती. कंत्राटी कामगार आणि अधिकाऱ्यांचा अपवाद सोडला तर मोजकेच कर्मचारी कार्यालयात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पुरवठा विभाग आणि तहसील कार्यालयात शुकशुकाट होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल खात्यात फक्त एकच कर्मचारी कामावर होता. महसूल विभाग, करमणूक कर विभाग, गृहशाखा, नगरपालिका विभागातील कर्मचारी संपात गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक संपावर गेल्याने त्यांची जागा इतरांनी घेतली. प्रत्येक विभागात डाक स्वीकारायला कर्मचारी नव्हते. संजय गांधी निराधार योजना, सेतू कार्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांच्या निपटाऱ्यालाही संपाचा फटका बसला. तहसील(ग्रामीण)मधील निवडणूकविषयक कामे होऊ शकली नाही. विभागीय आयुक्त कार्यालयात अशीच स्थिती होती. लिपिकांना त्यांच्याकडे असलेल्या विविध फाईल्सची माहिती असते. मात्र ते संपावर असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांना फिरावे लागले. संप असतानाही मुंबईवरून माहिती मागविणे सुरूच होते. तो कशी द्यायची, असा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे होता.आंदोलनात संघटनेचे सतीश जोशी, प्रमोद बेले, ईश्वर बुधे, नाना कडबे यांच्यासह मंदा शंभरकर, छाया तापने, मालती पराते, हेमा भातकुलकर, ममता वळणे, मधुकर साखरे, श्रीकांत चवटे, सतीश चरडे, संजय निलावार, चंद्रशेखर क्षेत्रपाल, श्याम गोसावी यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)सचिवांच्या बैठकीला फटकासंपाचा फटका विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या सामान्य प्रशासन खात्याचे प्रधान सचिव भगवान सहाय यांच्या बैठकीलाही बसला. कर्मचारी, शिपाई आणि वाहनचालकही नसल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. वाहनचालक इतर विभागातून बोलावण्यात आले.
महसूल प्रशासन कोलमडले
By admin | Updated: August 3, 2014 00:59 IST