कल्याण : येथील निवृत्त पोलीस अधिकारी नारायण यशवंत भानुशाली (६२) यांनी डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आधारवाडी परिसरातील रॉयल रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये घडली. त्यांची पत्नी अंजली यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पत्नीच्या विरहामुळे आलेल्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली. भानुशाली हे नवी मुंबई येथून पोलीस उपनिरीक्षक म्हणून चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले. सर्वाधिक काळ त्यांनी ठाणे ग्रामीण भागामध्ये सेवा बजावली होती. एक चांगले अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. रविवारी रात्री घरी एकटे असताना त्यांनी स्वत:च्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडली. शेजारी राहणाऱ्यांना गोळीचा आवाज आल्याने त्यांनी भानुशाली यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र, ते गतप्राण झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची नोंद खडकपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST