मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल बुधवार, २४ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. शिवाय गुणपत्रिकेची विषयनिहाय माहिती आणि प्रिंट आउट घेता येईल.गुणपत्रिकांची तारीख मंडळांकडून कळविली जाईल, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. नऊ विभागीय मंडळांतून ९ ते २९ जुलैदरम्यान बारावीची फेरपरीक्षा घेण्यात आली होती. त्यास१ लाख २५ हजारांच्या दरम्यान विद्यार्थी बसले होते. गुणपडताळणीसाठी विहित शुल्कासह २५ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची प्रत हवी आहे, त्यांना निकालानंतर मंडळाकडे असलेल्या विहित नमुन्यात २५ आॅगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करता येईल. (प्रतिनिधी)
आज बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 5:40 AM