मुंबई : वरळी येथील दुग्धशाळेतील नवीन मशिनरी २00५ पासून बंद तर मातृदुग्धशाळा, कुर्ला ही किरकोळ कारणास्तव तीन वर्षांपासून बंद आहे. तेथीलही काही मशिनरी इतरत्र हलवण्यात आल्या आहेत तर काही बंद ठेवण्यात आल्या आहेत. शासनाने या दुग्धशाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रामराजे भोसले यांनी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली आहे.शासनच्या दुध परिवहन सेवेतील अनेक चालू स्थितीतील राज्यातील टँकर्स, ट्रक, बसगाड्या, जीप आदी हजारो वाहने सीएनजी किट बसवून वापरात न आणता भंगारात विकण्यात आली. त्यामुळे दुधसंकलन सेवा पुर्णपणे बंद करून खाजगी कंत्राटदारांना दुधसंकलन आणि वितरण करण्यास दिल्यामुळे केंद्रचालकांना योग्य प्रमाणात व योग्यवेळी दुधपुरवठा होत नाही. या संदर्भात दुग्धविकास मंत्रालयाकडे तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे रामराजे भोसले यांनी सांगितले.मुंबईत तसेच राज्यात शुद्ध दुध व दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी असूनही शासनाच्या दुग्धशाळांमध्ये नियमित व योग्यरितीने दुधपुरवठा होण्यासाठी कोणतीतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे दुधाची आवक अत्यंत नगण्य आहे. संपूर्ण राज्यात अनेक दुधसंकलन केंद्रे बंद करण्यात आल्याने कित्येक ठिकाणी दुध घेण्यास नकार दिला जात आहे. तसेच दुधपरिवहन सेवेची संकलनव्यवस्था कोलमडल्याने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव मिळेल त्या दराने दुध विकावे लागते. दुधाचा रास्त दर मिळत नसल्याने दुधउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, असेही भोसले यांनी सांगितले.दरम्यान पुन्हा दुग्ध डेअरी केंद्रे सुरू झाल्यास नागरिकांना, हॉस्पिटल, शाळा, आदिवासी विभाग, सैनिकी, पोलीस विभाग इत्यादी शासकीय यंत्रणांना शासनाने दुधपुरवठा केल्यास नागरिकांना शुद्ध व सकस दुध मिळेल. लाखो शेतकऱ्यांना रास्त भाव मिळेल तसेच हजारो लघुउद्योजकांना, कामगारांना व बेरोजगारांना काम मिळेल, असेही रामराजे भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बंद पडलेल्या दुग्धशाळा पुन्हा सुरू करा
By admin | Updated: April 8, 2017 03:09 IST