जयंत धुळप,
अलिबाग- रायगड जिल्ह्यात कर्जत, खालापूर, पनवेल आणि महाड या तालुक्यांत कुपोषित बालकांची समस्या गंभीर बनली आहे. कुपोषणावर मात करण्याकरिता रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केली होती. परंतु या बैठकीस संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थितच राहिले नसल्याने अधिकाऱ्यांना समस्येबाबत गांभीर्यच नसल्याची भावना आदिवासी क्षेत्रात या समस्या निर्मूलनाकरिता कार्यरत असलेल्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी केली आहे.कर्जत, खालापूर आणि पनवेल तालुक्यातील आदिवासी गावे आणि वाड्यांवर पोहोचून कुपोषित आदिवासी बालके आणि त्यांच्याशी निगडित समस्यांचे सर्वेक्षण कर्जत येथील दिशा केंद्र या अशासकीय स्वयंसेवी संस्थेने केले होते. त्यांनी ही समस्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले अहवालाद्वारे लक्षात आणून दिली. त्यावर गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ आदेश देवून समस्या नियंत्रणात आणण्याकरिता यंत्रणा कार्यान्वित केली होती. या सर्व कुपोषणाच्या मुक्तीकरिता उपाययोजनासंदर्भात दिशा केंद्र या अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारी संचालक अशोक जंगले यांनी एक अहवाल जिल्हाधिकाऱ्यां दिला. वाढत्या कुपोषणावर मात करण्याकरिता दिशा केंद्राच्या कार्यकर्त्यांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी केले होते. या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बाळासाहेब रांजळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एम. डी. गायकवाड आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी हे अधिकारीच गैरहजर राहिल्याने, अंतिम उपाययोजनेचे नियोजन होवू शकले नाही, अशी नाराजी दिशा केंद्र अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे कार्यकारी संचालक अशोक जंगले यांनी व्यक्त केली. उपस्थित सदस्यांशी विचारविनिमय करून कर्जत तालुक्यात गावस्तरावर ८२ ग्रामबाल पोषण केंद्रे(व्हीसीडीसी) तर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर बाल आरोग्य सुधार केंद्रे (सीटीसी) येत्या आठ दिवसांत कार्यान्वित करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे जंगले सांगितले.>हा प्रश्न आमच्याशी निगडित नाहीआदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी बाळासाहेब रांजळे यांनी, माझा प्रतिनिधी बैठकीला पाठविला होता, मला येता आले नाही असे सांगितले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एम.डी.गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, कुपोषण हा विषय आमच्याशी निगडित नाही तसेच या बैठकीचे आपणास निमंत्रणही नव्हते, असे सांगितले. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी यांच्या कार्यालयात व मोबाइलवर अनेकदा संपर्क साधला, परंतु ते उपलब्ध होवू शकले नाहीत.