- गणेश वासनिक, अमरावतीप्रत्यक्ष जंगलांचे संरक्षण करणाऱ्या वनपाल, वनरक्षकांना कुठल्याही प्रकारचे शस्त्र देण्यात आलेले नसल्याने, विस्तीर्ण जंगल आणि वन्यपशुंचे संरक्षण नि:शस्त्र कर्मचारी कसे करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तस्करांनी वेढलेल्या जंगलात वनकर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने, या प्रश्नाचे गांभीर्य वाढले आहे.वनपालपदाला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला, परंतु त्यांना कोणतीही शस्त्रे देण्यात आलेली नाहीत. वनरक्षक, वनपालांना शस्त्रे देण्याची राज्य वनपाल, वनरक्षक संघटनेची फार जुनी मागणी आहे. मात्र, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही, असा संघटनेचा आरोप आहे. अतिसंवेदनशीलक्षेत्रात कार्यरत वनपालांची संख्या १२०० च्या घरात असून, त्यांनाशस्त्र मिळाल्यास ते त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडू शकतात.राज्यातील ४० वनविभागांमध्ये २० पेक्षा अधिक वनपरिक्षेत्रांत अवैध सागवान तस्कर, अतिक्रमण आणि वाघ, बिबट्यांच्या शिकारी टोळींनी धुमाकूळ घातला आहे. वनपाल, वनरक्षकांची शस्त्रे पुरविण्याची मागणी वनविभागाने प्रलंबित ठेवल्याचे दिसते. दोन वर्षांपूर्वी चंद्रपूर व मेळघाटात वाघांची शिकार करणारी सशस्त्र टोळी वनपाल, वनरक्षकांनीच पकडली होती.गेल्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीपरिसरात सागवान तस्करांना रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या वनरक्षक, वनपालांवर तस्करांनी सशस्त्र हल्ला चढविला. याहल्ल्यात चार वनकर्मचारी गंभीर जखमी झाले. वातानुकूलित कक्षात बसून, जंगलाच्या संरक्षणाचे नियोजन करणाऱ्या अनेक वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या रिव्हॉल्व्हर कपाटात बंद आहेत. मुख्य वनसंरक्षक, सहायक मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्राधिकारी या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना शासनाने जंगल संरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर दिल्या आहेत. मात्र, हे वनाधिकारी जंगलात फिरत नसल्याचे चित्र आहे.वनपाल, वनरक्षकांना रिव्हॉल्व्हर देण्याविषयीची मागणी असेल, तर या संदर्भात नक्कीच शासन सकारात्मक तोडगा काढेल. वनकर्मचाऱ्यांवर तस्करांकडून हल्ला होणे ही बाब चिंतनीय आहे. वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत लवकरच आवश्यक उपाययोजना केल्या जातील.- सुधीर मुनगंटीवार, वने व अर्थमंत्री
जंगल संरक्षणाची जबाबदारी नि:शस्त्र वनरक्षक, वनपालांवर!
By admin | Updated: December 30, 2015 01:52 IST