वेदप्रकाश मिश्रा : रसायनशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटननागपूर : मागील १०० वर्षांपूर्वीच्या समाजाशी तुलना केली असता प्रगतीचा आलेख हा झपाट्याने उंचावला असल्याचे लक्षात येते. विशेषत: आता तर विज्ञानाला आणखी गती आली आहे. हा सर्व बदल संशोधनामुळेच दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने संशोधन ही विकासाची जननी आहे, असे मत कऱ्हाड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर रसायनाशास्त्र विभाग, पोरवाल कॉलेज व इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन्सिक सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान ते बोलत होते.‘फ्युचरिस्टिक मटेरिअल्स अॅन्ड इमर्जिंग ट्रेन्ड्स इन फॉरेन्सिक अॅन्ड लाईफ सायन्सेस’ या विषयावरील या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.के.सी.देशमुख, प्रा.एन.बी. सिंग, विजयकुमार शर्मा, रसायनशास्त्र विभाग प्रमुख एच.डी. जुनेजा, डॉ. एम.एन.घोशाल, डॉ. अंजली राहाटगावकर, जर्मनी येथील प्रा. जे.कोल्हर, नायजेरिया येथील प्रा.गॉडविन ओनू हे प्रामुख्याने उपस्थित होते. यशस्वी व्यावहारिक संशोधनाची परिणती नवे तंत्रज्ञान निर्माण करण्यात होते. तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुखकर आणि सोपे करण्यासाठी नवनवीन वस्तू व गॅजेट्स तयार होतात. शिवाय वाहतूक, दळवळण, संचार आणि आरोग्य यासांरख्या क्षेत्रातदेखील प्रगतीची झेप दिसून येत आहे.देशाचा विकासदेखील विज्ञानातूनच शक्य आहे असे डॉ.मिश्रा म्हणाले. विकासाचे दुष्परिणामदेखील दिसून येत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानासमोर प्रदूषणाचे मोठे आव्हान आहे . शिवाय मनुष्याची जागा रोबोट घेत असल्याने रोजगारावरदेखील परिणाम होण्याचा धोका आहे, असे मत डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले. या परिषदेला १९ आंतरराष्ट्रीय संशोधक, ४६ राष्ट्रीय दर्जाचे संशोधक आणि ५०० च्या वर प्राध्यापक, संशोधक, ख्यातनाम व्यक्ती आणि उद्योजक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. पोरवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर धोंडगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
संशोधन हीच विकासाची जननी
By admin | Updated: February 6, 2015 00:57 IST