ऑनलाइन लोकमत
जीवरक्षक, देवस्थान कर्मचारी, पोलीस, मच्छिमार यांची सांघिक कामगिरी
गणपतीपुळे, दि. 14 - फिरण्याचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळेत आलेल्या संगमेश्वरच्या दोन तरूणांना आज बुधवारी बुडताना वाचवण्यात आले. किनाऱ्यावरील जीवरक्षक, गणपतीपुळे देवस्थानचे कर्मचारी, पोलीस तसेच स्थानिक मच्छीमारांनी वेळीच धावाधाव केल्याने दोघांचाही जीव वाचला. अल्ताफ अब्बुद बोट (२२) आणि सौद खाफीब खान (१७) अशी त्यांची नावे आहेत.
पावसाने उघडीप घेतल्यामुळे आणि अजूनही सुट्ट्या असल्याने गणपतीपुळे येथे फिरायला येणाऱ्याची संख्या अधिक आहे. संगमेश्वर येथील गॅरेज व्यावसायिक अल्ताफ बोट आणि न्यू ज्युनिअर कॉलेज पैसा फंड येथे शिकणारा सौद खान हे गणपतीपुळे समुद्रचौपाटीवर फिरण्यासाठी आले होते. गणपती मंदिरासमोर पाण्यात उतरून ते पुढे पुढे जाऊ लागले व मोठ्या चाळात (पाण्यातील भोवरा) अडकले. ते बुडत असल्याचे त्यांचे नातेवाईक व मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. यावेळी जीवरक्षक राज देवरुखकर, योगेश पालकर, देवस्थान कर्मचारी दत्तात्रय माईन, हेमंत गावणकर, सुरक्षा रक्षक प्रमोद बाचिम, मच्छीमार पाटील यांच्यासह समुद्रावर गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पाटील, हेडकॉन्स्टेबल व्ही. के. बनप, कॉन्स्टेबल मोहन पाटील, होमगार्ड नीलेश कळंबटे, मनोज घाणेकर, यांनी तातडीने हालचाल केली व दोन्ही बुडणाऱ्या तरूणांना बाहेर सुखरूप काढले.
अन दोरी तुटली
राज देवरुखकर, योगेश पालकर, दत्तात्रय माईण, हेमंत गावणकर हे पाण्यामध्ये गेले होते. जाताना ते आधारासाठी तसेच दोघांना परत आणण्यासाठी दोरी घेऊन गेले होते. मात्र अर्ध्यावर गेल्यानंतर ही दोरी तुटली. तरीही या चौघांनीही आपले कौशल्य वापरत दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. एप्रिल महिन्यानंतर पहिल्यांदाच अशी पर्यटक बुडण्याची घटना घडली आहे.