जमीर काझी, मुंबईवाढते पाश्चातीकरण, चंगळवाद व धकाधकीचा परिणाम मानवी जीवनात महत्वपूर्ण असलेल्या विवाह या घटकावर होत असून या नात्याची विण निसटत चालल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षात एकट्या मुंबईतून ३२हजार ७६२ दाम्पत्य एकमेंकापासून विभक्त झाले आहेत. गतवर्षात तब्बल ५९४९ जणांनी आपल्या जोडीदारापासून फारकत घेतली आहे किंवा त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. माहिती अधिकार कायद्यान्वये प्रस्तूत प्रतिनिधीने मिळविलेल्या माहितीतून विवाह संस्कृतीच्या दृष्टिने चिंताजनक असलेली ही बाब समोर आली आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, असे भारतीय संस्कृतीत समजले जात असलेतरी आयुष्यभराची साथ अर्धावरच सोडण्याची मानसिकता नवदाम्पत्यांमध्ये वाढली आहे. रोज सरासरी १६-१७ जण तर महिन्याला ४९५ जण कौटुंबिक न्यायालयात आपल्या जोडीदारापासून स्वतंत्र होण्यासाठी धाव घेतात. घटस्फोटासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱ्यामध्ये पुरुषाचे प्रमाण अधिक आहे, मात्र पतीपासून फारकत घेत आपल्या भावी आयुष्याच्या वाटा स्वतंत्रपणे चोखाळण्याचा निर्णय घेतलेल्या तरुणींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.एकीकडे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे प्रमाण वाढत आहे,त्याचवेळी रितसर लग्नाच्या बंधनात जोडलेले तरुण-तरुणींचे सात जन्मे राहु दे, याच जन्मात ऐकमेकांशी पटेना झाले आहे. एक जानेवारी २००९ पासून ३१ डिसेंबर २०१४पर्यत घटस्फोटासाठी वांद्रेतील कौटुंबिक न्यायालयात कोर्टात तब्बल ३२हजार ७६२ याचिका दाखल झाल्या आहेत.
नात्याची वीण निसटतेय...!
By admin | Updated: January 26, 2015 05:00 IST