बारामती (जि़ पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी बारामती सज्ज झाले आहे. बारा हजार आसनक्षमतेचा शामियाना उभारण्यात आला असून, मोदींच्या स्वागतासाठी रेडकार्पेट अंथरण्यात आले आहे. मोदी ज्या मंचावरुन भाषण देणार आहेत, त्यासमोरील रांगोळीत खास कमळाची फुलेही असणार आहेत. मोदींच्या बारामती भेटीची बारामतीतच नव्हे तर सर्व राज्यभरच उत्सुकता आहे. येथील कृषी विज्ञान केंद्रात भाजीपाला पिकाच्या उत्पादकतेवरील देशातील पहिले संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्राच्या भूमीपूजनासाठी मोदी शुक्रवारी येत आहेत. त्यानिमित्त कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी मेळावा होणार आहे. स्वत: शरद पवार व अजित पवार यांनी शुक्रवारी तयारीचा आढावा घेतला़ शामियान्यातील बैठकीसाठी वेगवेगळे २० विभाग करण्२यात आले आहेत. आमदार, खासदार, विशेष अतिथी तसेच खास पवार कुटुंबियांसाठी देखील एक विभाग राखीव असणार आहे. मोदींचे भाषण शेतकऱ्यांना जवळून ऐकता यावे यासाठी सहा एलईडी स्क्रीन सभास्थानी लावण्यात आले आहेत. विज्ञान केंद्रातील शेतकरी निवासासमोर बारामतीतील विविध सहकारी संस्थांचे स्टॉॅल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉलमध्ये बारामतीत पिकणारे थायलंड जातीचे सुमारे अर्धा किलो वजनाचे जम्बो पेरु, गरेदार तैवानी पपया, जम्बो सिडलेस द्राक्ष अन् वीस फूट ऊंचीचे ऊस लक्ष वेधून घेत आहेत. खास मोदींसाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. (वार्ताहर)
मोदींसाठी बारामतीत रेडकार्पेट!
By admin | Updated: February 14, 2015 03:51 IST