एचआरडी चमू लवकरच येणार : अर्थसंकल्पात मिळू शकतात १२५ कोटी रुपये आशीष दुबे - नागपूरदेशातील १३ विख्यात व्यवस्थापन संस्था (आयआयएम)सोबतच आयआयएम नागपूरमध्ये सुद्धा प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी आयआयएम नागपूर पूर्णपणे तयार आहे. सुरुवातीला येथे ६० जागांसाठी प्रवेश दिले जातील. आयआयएमच्या अधिकृत वेबसाईटवर यासंबंधात स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. वेबसाईटवर जारी अधिसूचनेनुसार देशातील सहा राज्यांमध्ये आयआयएम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘कॅट २०१४’साठी होणाऱ्या नोंदणीच्या कार्यक्रमात या सहाही आयआयएमचा समावेश करण्यात येणार आहे. सोबतच शैक्षणिक सत्र २०१५-१६ साठी होणाऱ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सुद्धा त्यांचा समावेश करण्यात येईल. लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार यासंबंधात केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय (एचआरडी), विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआयटी) प्रशासन आणि आयआयएम अहमदाबाद यांच्यात सातत्याने बैठका सुरू आहेत. संसदेमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आयआयएम नागपूरसाठी निधीची तरतूद होण्याची दाट शक्यता आहे. व्हीएनआयटी परिसरातील ज्या इमारतीची निवड आयआयएमसाठी करण्यात आली आहे, ती इमारत बनून पूर्ण झाली आहे. एचआरडी चमू या इमारतीचे निरीक्षण करेल. त्यांच्या शिफारशीनुसार त्यात काही बदल केले जातील. हे सारे बदल आयआयएम अहमदाबाद यांच्यानुसार होतील. एचआरडी चमू इमारतीची पाहणी करायला कधी येईल, याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात चमू येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयआयएम नागपूरच्या इमारत व साधन सुविधांना अंतिम मंजुरी देण्याच्या कामामध्ये गुंतलेले व्हीएनआयटी प्रशासनाचे अधिकारी सध्या यासंबंधात काहीही सांगायला तयार नाहीत. मात्र संस्थान सुरू होताच विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या पायाभूत व इतर सुविधा मिळाव्यात यादृष्टीने आयआयएम नागपूरसाठी अर्थसंकल्पात १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता आहे. आम्ही तयार आहोतआयआयएमसाठी आम्ही सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. ३० हजार वर्गफूट क्षेत्रात इमारत तयार आहे. लायब्ररी व प्रयोगशाळा सुद्धा आहे. शैक्षणिक सत्र २०१५-१६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाईल. जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन संस्थेमध्ये ज्या सोयी सुविधा मिळतात त्या सर्व प्रकारच्या सुविधा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळतील.इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. एचआरडी चमूची प्रतीक्षा आहे. आयआयएम सुरू करायला किती खर्च येईल, हे एचआरडी चमू आल्यावरच माहीत होईल. विश्राम जामदार अध्यक्ष - व्हीएनआयटी
प्रवेशासाठी सज्ज आयआयएम
By admin | Updated: February 8, 2015 01:19 IST