ऑनलाइन लोकमत
धडगाव, दि. 29 - रोषमाळ बुद्रूक गटाच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार योगेश दिलीप पाटील हे ३७६ मतांनी निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या संध्या विजय सोनार यांना पराभूत केले. येथे सरळ लढत रंगली होती.धडगाव तालुक्यातील रोषमाळ बुद्रूक गटाचे सदस्य दिलीप पाटील यांचे जून महिन्यात निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर सदस्य निवडीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सर्वसाधारण गटासाठी असलेल्या या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीकडून निवडून आलेले कै.दिलीप पाटील यांचे चिरंजीव योगेश पाटील यांनाच राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून उभे करण्यात आले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या संध्या विजय सोनार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे येथे सरळ लढत रंगली होती.रविवारी झालेल्या मतदानात एकुण ८४ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणी घेण्यात आली. सकाळी १० वाजेला सुरू झालेली मतमोजणी अवघ्या तासाभरात आटोपली. योगेश पाटील यांना दोन हजार २४५ मते तर संध्या सोनार यांना एक हजार ८६९ मते मिळाली. त्यामुळे योगेश पाटील यांना ३७६ मतांनी विजयी घोषीत करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शाम वाडकर होते.