अमरावती : भारताला स्वातंत्र्य मिळावे हे सर्व भारतीयांचे प्रमुख उद्दिष्ट होते. लाखो भारतीयांना एकत्रित आणून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करून प्रेरणा देण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याकाळी केले. त्यामुळे ते स्वातंत्र्याचे महायोद्धा ठरतात, असे प्रतिपादन प्राचार्य सुनंदा जामकर यांनी केले. धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम स्मृती ग्रामगीता व्याख्यालमालेत प्रमुख वक्ते म्हणून त्या बोलत होत्या. 'स्वातंत्र्य युद्धातील महायोद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज' या विषयावरील व्याख्यानप्रसंगी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू मोहन खेडकर, प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम जन्मशताब्दी केंद्रीय समितीचे अध्यक्ष मधुभाऊ घारड, धारणीच्या दयाराम पटेल स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष वीणा रमेश मालवीय, संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भिसे, ब्रिटन येथील साजिद शेख, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य एम.ए. काझी उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रसंतांनी अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार केलेत. भारताला स्वातंत्र्य मिळावे आणि स्वातंत्र्यांच्या महान कार्यात भारतीय जनतेचा व विशेषत: युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग रहावा, यासाठी १९३३ साली आरती मंडळाची स्थापना करून त्यांनी जनतेचे प्रबोधन केले. अशिक्षित लोकांना एकत्रित करणे, त्यांना स्वातंत्र्य उठावामध्ये सहभागी करून घेण्याचे काम महाराजांनी करुन स्वातंत्र्ययुद्धाची पायाभरणी केली. भजन, रामधून या माध्यमाचा वापर भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत चेतविण्यासाठी केला. भारतीय युवक बलवान व्हावा, तो स्वातंत्र्य युद्धात कामी यावा यासाठी महाराजांनी गावोगावी व्यायाम मंदिरे उघडली व गुरूदेव सेवा मंडळाची स्थापना केली. राष्ट्रसंतांच्या नेतृत्वात प्रचारभीष्म श्यामरावदादा मोकदम यांनी स्वातंत्र्य लढ्याची धुरा सांभाळली. श्यामरावदादा मोकदम महाराजांचे खंदे समर्थक होते. त्यामुळेच स्वातंत्र्य युद्धातील महायोद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ठरत असल्याचे मत जामकर यांनी व्यक्त केले. कुलगुरू मोहन खेडकर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलेले चांगले गुण आत्मसात करावे. प्रास्ताविक व परिचय जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, संचालन श्रीखंडे, तर आभार प्राचार्य एम.ए. काझी यांनी मानले. व्याख्यानाला धारणीतील प्रतिष्ठित नागरिक, गुरूदेव सेवा मंडळाचे भक्तगण, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वातंत्र्याचे महायोद्धा
By admin | Updated: September 28, 2015 02:39 IST