अकोला : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी किसान संयुक्त मोर्चातर्फे अकोल्यात भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत व युद्धवीर सिंह यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी आयोजित किसान कैफीयत शेतकरी महापंचायत रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकरी जागर मंचच्यावतीने मंगळवार १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले.
अकोल्यात २० फेब्रुवारी रोजी खुले नाट्यगृह येथे किसान कैफीयत शेतकरी महापंचायत आयोजित करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान विकास मंच, शेतकरी जागर मंच, कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार आदी संघटनतर्फेां आयोजित या सभेला संबोधित करण्यासाठी राकेश टिकैत व युद्धवीर सिंह येणार होते. दरम्यान, अकोला जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने १६ फेब्रुवारीपासून प्रतीबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. या आदेशानुसार सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर कडक प्रतिबंध लावण्यात आले. तसेच गर्दी करणारा कार्यक्रम आयोजित करू नये, असे जिल्हा प्रशासनाने शेतकरी जागर मंचास लेखी कळविले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत किसान कैफीयत शेतकरी महापंचायत रद्द करण्यात आल्याचे शेतकरी जागर मंचाने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये जाहीर केले. कोरोनाचा प्रादूर्भाव ओसरल्यानंतर हा कार्यक्रम घेण्यात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.